yuva MAharashtra महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची खलबत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा

महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची खलबत; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा



सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची लगबग सुरू झाली आहे. नुकतंच भाजपने लोकसभेसाठी रनशिंग फुंकलं असून १९५ उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. अशातच आता युती असेल किंवा आघाडी गेल्या काही दिवसापासून सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. जागा वाटपात बाबती युती आणि आघाडी जवळपास अंतिम टप्प्यांमध्ये आलेले आहेत. कधीही आचारसंहिता घोषित होईल, अशा पद्धतीची परिस्थिती सध्या आहे. त्यामुळेच महत्त्वाच्या नेत्यांसोबतच आता राजकीय पक्षातील युवक आघाडी देखील गतिमान झाल्याचं पहायला मिळतंय.

नुकतीच महाविकास आघाडीच्या युवा नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या युवक आघाडीचे अध्यक्ष मेहबूब शेख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासह तिन्ही पक्षातील युवक आघाडीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


आगामी काळ हा महाविकास आघाडीच्या दृष्टीने सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असणार आहे शिवाय लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं तर ते पुढील राजकीय लढाईसाठी महाविकास आघाडीला बळ देणारा असणार आहे त्यामुळेच युवक आघाडीची महाविकास आघाडीतील भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे या दृष्टीने विविध मुद्द्यांवरती मुंबई झालेल्या या बैठकीत महत्त्वाची चर्चा झालेली आहे त्यामुळे प्रमुख वरिष्ठ नेत्यांसोबत आता युवा फळी ही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेली पाहायला मिळतेय. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीवरून महायुतीत धुमसान पहायला मिळतंय. तर महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली पहायला मिळत आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये रंगतदार भिडत पहायला मिळण्याची शक्यता आहे.