सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
मुंबई - ग्रह-ताऱ्यांसाेबत आपल्याला कधी-कधी धूमकेतूंचेही दर्शन घडत असते. असाच एक नवा पाहुणा म्हणजे 'पाॅन्स-ब्रुक्स' धूमकेतू हाेय. २१ एप्रिल राेजी पश्चिम आकाशात देवयानी तारकासमूहाजवळ या धूमकेतूचे उघड्या डाेळ्यांनी दर्शन घेता येईल. हा धूमकेतू ७१ वर्षांनी पृथ्वी व सूर्याजवळ येत आहे. खगाेल अभ्यासक प्रभाकर दोड यांच्या माहितीनुसार, १८१२ साली जीन लुईस पाॅन्स व त्यानंतर १८८३ साली विल्यियम राॅबर्ट ब्रुक या खगाेल शास्त्रज्ञांना हा धूमकेतू सापडला हाेता.
धूमकेतूच्या लांब शेपटीचेही दर्शन
जून महिन्यात तर ताे पृथ्वीच्या आणखी जवळ राहणार असून, लहान दुर्बिणीने त्याचे सुंदर रूप पाहता येईल. या काळात ताे सूर्याच्याही जवळ असेल. हॅली धूमकेतूप्रमाणे पाॅन्स-ब्रुक्स धूमकेतूच्या लांब शेपटीचे दर्शन रात्रीच्या प्रारंभी पश्चिमेस घेता येईल.
आकर्षक घडामोडींचा सप्ताह
२० मार्च रोजी महाविषुव दिन असून, पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धात दिवस-रात्र समान असतात. या दिवशी सूर्याबरोबर निश्चित पूर्वेला असतो. यालाच वसंत संपात दिन म्हणतात. २१ला सौर चैत्रारंभ होत असून, पर्यावरणपूरक असा जागतिक वन दिन साजरा केला जातो.
२२ मार्चला सर्वात तेजस्वी शुक्र व वलयांकित शनी ग्रह युती स्वरूपात अगदी जवळ बघण्याची संधी पहाटे पूर्व आकाशात असेल. पहाटे ३:३६ वाजता यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल.
२३ रोजी पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अंतर अधिक असल्याने चंद्र आकाराने जरा लहान दिसेल.
२४ला होळी पौर्णिमा असून, निसर्गातील सुरू होणाऱ्या विविधरंगी उत्सवात निसर्ग संवर्धनार्थ सहभागी होता येईल.