सांगली समाचार - दि. २० मार्च २०२४
नवी दिल्ली - भारत आणि चीन या दोन राष्ट्रांत तणाव वाढलेला आहे, आणि दोन्ही देशांनी सीमेवर सैन्याची मोठी जमवाजमव केलेली आहे, त्यामुळे दोन्ही देशांत सशस्त्र संघर्ष होण्याची शक्यता आहे अशी चिंता अमेरिकेतील गुप्तचर संस्था डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स या संस्थेने व्यक्त केली आहे. या संस्थेने ११ मार्चला हा अहवाल सादर केला आहे.
भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढलेला आहे, यातून लहान चकमकी होत असतात. यातून मोठा संघर्ष होऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. “भारत आणी चीन यांच्यातील सीमेवरून वाद सुरू आहे आणि त्यातून द्विपक्ष संबंध ताणले गेले आहेत. २०२०नंतर दोन्ही देशांत मोठा संघर्ष निर्माण झालेला नाही. पण दोन्ही देशांनी सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव केलेली आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांत होणाऱ्या लहानसहान चकमकींचे रुपांतर मोठ्या सशस्त्र संघर्षात होऊ शकते,” असे हा अहवाल सांगतो.
पाकिस्तानबद्दलचा उल्लेख
चीन स्वतःच्या सीमेपलीकडे जात पाकिस्तान, श्रीलंका येथे लष्करी तळ उभे करत आहे, यातून चीनच्या सीमेपलीकडील महत्त्वाकांक्षा दिसून येतात, असेही यात म्हटले आहे. तसेच पाकिस्तानकडून चिथावणी दिली गेली तर मोठ्या संघर्षाचा भडका उडू शकतो, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
भारत, चीन सीमेवर किती सैन्य?
लडाखमध्ये मे २०२०मध्ये भारत आणि चिनी फौजा एकमेकांसमोर आल्या होत्या. या परिसरात दोन्ही देशांचे पन्नास हजारांचावर सैनिक आहे. सीमेवर जोपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होणार नाहीत, अशी भूमिका भारताची आहे. भारताने काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये सेला बोगद्याचे उद्धाटन केले आहे. लष्करी धोरणांतून हा बोगदा भारतासाठी महत्त्वाचा आहे.