yuva MAharashtra ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

ईडीने जप्त केलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा





सांगली समाचार - दि. २८ मार्च २०२४
नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये अंमलबजावणी संचालनालयाच्या धाडी वाढल्या आहेत. यावरुन विरोधक सतत केंद्र सरकारवर टीका करतात. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेला पैसा लोकांना परत करणार, असे वक्तव्य पीएम मोदींनी केले आहे.

कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपने राजघराण्यातील सदस्य अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. आज पीएम मोदींनी अमृता यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी पीएम मोदी म्हणाले, ईडीने पश्चिम बंगालमध्ये 3000 कोटी रुपये जप्त केले आहेत. हा गरिबांचा पैसा आहे. कोणी शिक्षक होण्यासाठी पैसे दिले, तर कोणी कारकून होण्यासाठी पैसे दिले. माझी इच्छा आहे की, नवीन सरकार बनताच गरीब जनतेचा पैसा त्यांना परत केला जावा. यासाठी मी कायदेशीर सल्ला घेतोय. बंगालच्या लोकांनी विश्वास ठेवावा की, ईडीने जप्त केलेले 3000 कोटी रुपये परत करण्यासाठी भाजप सरकार काही ना काही मार्ग शोधेल.



कोण आहेत अमृता रॉय?

अमृता रॉय 18व्या शतकातील स्थानिक राजे कृष्णचंद्र रॉय यांच्या घराण्याच्या वंशज आहेत. लोकसभा निवडणुकीत कॅश फॉर क्वेरी प्रकरणात अडकलेल्या महुआ मोईत्रा यांच्यावर टीएमसीने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे, तर भाजपने कृष्णानगरमधून त्यांच्या विरोधात 'राजमाता' अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. अमृता रॉय यांनी 20 मार्च रोजी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना उमेदवारी देण्याचा भाजपचा निर्णय हा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीटही देण्यात आले. आता पीएम मोदींनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला आणि बंगालमधील भ्रष्टाचार संपवण्याच्या भाजपच्या योजनेवर भाष्य केले.