सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
सांगली - सांगलीतील हक्काचा काँग्रेसचा मतदारसंघ कुणाच्यातरी सांगण्यावरून दुसऱ्याच्या घशात जातो आहे, हे आम्ही सहन करणार नाही. तुम्ही अपक्ष म्हणून लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. असे असंख्य कार्यकर्त्यांचे संदेश विशाल दादा पाटील यांना विविध माध्यमातून पोहोचत आहेत. मात्र विशाल दादा असोत वा डॉ. विश्वजीत कदम यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
काल पै. चंद्रहार पाटील यांचा 500 गाड्यांचा ताफा मुंबईला निघाल्यापासून इकडे विशाल दादांच्या कार्यकर्त्यांची घालमेल वाढलेली आहे. आपण सर्वांनी गेली पाच वर्ष अतोनात कष्ट घेतलेले आहेत. समाजात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, दुष्काळाला तोंड देण्यात अपयश, असे अनेक प्रश्न समाजाला भेडसावत असताना आपण शांत बसणे योग्य नाही. या साऱ्याला उत्तर द्यायचे तर तुमच्यासारखा खंबीर नेता संशोधक हवा, असे कार्यकर्त्यातून व जनतेतून बोलले जात आहे.
सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाला गेली तर काय ? अशावेळी जनतेतील सहानभूती, व कार्यकर्त्यांचा आग्रह, भाजपने अंतर्गत कलह या पार्श्वभूमीवर विशाल पाटलांचा विजय सोपा नसला, तरी तो अवघडही नाही. आवश्यकता आहे ती आत्मविश्वासाने उभी राहण्याची, कार्यकर्त्यांना विश्वास देण्याची आणि स्व. मदन भाऊ पाटील यांच्याप्रमाणे "मै हूं ना" चा नारा बुलंद करण्याची...