yuva MAharashtra राहुल गांधींची मुंबईत न्याय गर्जना; शिवाजी पार्कवरील सभेचे पोस्टर लाँच

राहुल गांधींची मुंबईत न्याय गर्जना; शिवाजी पार्कवरील सभेचे पोस्टर लाँच



सांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
मुंबई - काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा गुजरातमधून महाराष्ट्रात दाखल झाली आहे. न्याय यात्रा आता अंतिम टप्प्यात असून मुंबई येथे समारोपाची सभा होणार आहे. १७ मार्च रोजी राहुल गांधी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत राहुल गांधी काय बोलणार याची उत्सुकता आहे. दरम्यान यासभेच्या पोस्टरचे लॉन्चिंग आज करण्यात आले. सभेपर्यंत लोकसभा निवडणुकांची घोषणा झालेली असेल त्यामुळे या सभेच्या माध्यमातून इंडिया आघाडी निवडणुकीचे रणशिंग महाराष्ट्रातून फुंकणण्याची शक्यता आहे. सभेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे' ची रविवारी १७ मार्चला मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी पाच वाजता जाहीर सभेने सांगता होणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून या सभेच्या पोस्टरचे लॉन्चिंग  करण्यात आले. या पोस्टरमध्ये " शिवतीर्थावर होणार न्याय गर्जना, न्यायासाठी लढायचं गद्दारांना नडायचं, संविधानाला टिकवायचं, आठवणीने यायचं अशा आशयाचा मजकूर आहे.

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेने १२ मार्चला नंदूरबार येथून महाराष्ट्रात प्रवेश केला. १६ मार्चला चैत्यभूमी येथे यात्रेचा समारोप होणार आहे. १७ मार्चला मुंबईत होणाऱ्या ऐतिहासिक सभेत लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार आहे. या पार्श्वभूमीवर या पोस्टरचे अनावरण करण्यात आले आहे. यात गद्दारांना नडण्यासाठी,संविधान टिकवण्यासाठी, न्यायासाठी लढण्यासाठी आठवणीने या'असं आवाहन करण्यात आले आहे.