yuva MAharashtra ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी ५० कोटींचे अनुदान : बाबा कांबळे

ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी ५० कोटींचे अनुदान : बाबा कांबळे



समाचार - दि. १७ मार्च २०२४
मुंबई - रिक्षा, टॅक्सी चालकांच्‍या कल्‍याणकारी मंडळासाठी गेल्‍या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर त्‍याला यश आले आहे. राज्‍य शासनाने दिलेला शब्द पाळला आहे. ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी ५० कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. त्‍यामुळे राज्‍यभरातल २० लाख ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांचे कल्‍याण होणार असल्‍याचे प्रतिपादन ऑटो, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक, बाबा कांबळे यांनी केले.

ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांच्‍या मागण्यांसाठी तसेच रखडलेल्‍या प्रश्नांना शासनदरबारी मांडण्याचे काम संघटनेच्‍या वतीने केले आहे. कल्‍याणकारी मंडळाची स्‍थापना करून वाहतूकदार कष्टकऱ्यांचे हित जोपासावे ही प्रामुख्याने सातत्‍याने मागणी केली होती. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍याकडे देखील निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरात एका कार्यक्रमानिमित्‍त आलेल्‍या मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. अखेर या पाठपुराव्‍याला आणि मागणीला यश आल्‍याचे बाबा कांबळे म्‍हणाले. राज्‍य सरकारने संघटनेला दिलेला शब्द पाळला आहे. कल्‍याणकारी मंडळ स्‍थापन करण्यासाठी शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्‍यासाठी तब्‍बल ५० कोटी रुपये निधी देखील मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्‍यातील २० लाख ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांच्‍या आनंदाचा हा क्षण असल्‍याचे बाबा कांबळे म्‍हणाले.


या कल्‍याणकारी मंडळातून ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांना सामाजिक सूरक्षा, म्‍हातारपणी पेन्शन, आरोग्य विमा या सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. त्‍या अनुषंगाने राज्‍य सरकारने सकारात्‍मक निर्णय घेत पहिले पाऊल टाकले आहे. त्‍या बाबत सर्वत्र समाधान व्‍यक्‍त केले जात आहे.

गेल्‍या २० वर्षांपासून आम्‍ही सातत्‍याने यासाठी पाठपुरावा करत आहे. ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांच्‍या कल्‍याणकारी मंडळ सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍याकडे केली होती. त्‍या पाठपुराव्‍याला यश आले आहे. २० लाख ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांचे यामुळे कल्‍याण होणार असून त्‍यांना सामाजिक सुरक्षा व इतर सुविधा मिळणार आहेत. राज्‍य सरकारच्‍या या सकारात्‍मक निर्णयाचे स्‍वागत करीत आहोत.

बाबा कांबळे,
- राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो, टॅक्सी, ट्रक, टेम्‍पो, ट्रान्सपोर्ट फेडरेशन,
- अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत, संस्थापक :-ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य.