समाचार - दि. १० मार्च, २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकते त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि अरूण गोयल यांनी दिलेला हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. निवडणूक आयोगात आधीच निवडणूक आयुक्त हे एक पद रिक्त होतं. गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडेच पदभार आहे. निवडणूक आयोगात मुख्य निवडणूक आयुक्ताशिवाय इतर दोन आयुक्त असतात. आधी एक पद रिक्त होतं त्यानंतर आता अरूण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ही दोन्ही पदं रिक्त झाली आहेत.
लोकसभा निवडणूक पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची चिन्हं आहेत. आता निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठीची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर असणार आहे. निवडणूक तयारी कशी सुरु आहे यासाठी अरूण गोयल यांनी राजीव कुमार यांच्यासह काही राज्यांचा दौरा केला होता. आता अचानक त्यांनी तडकाफडकी आपलं पद सोडलं आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. ९ मार्च २०२४ म्हणजेच आजपासूनच हा राजीनामा स्वीकारला गेल्याचं राष्ट्रपती कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.