सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
मुबई - महायुती म्हणून लोकसभेला सामोरे जाताना, शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण, राष्ट्रवादी घड्याळ आणि भाजपाचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे काही उमेदवार कमळावर निवडणूक लढवतील, अशी टीका ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी केली होती. यावर आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'महायुतीमधील तिन्ही घटकपक्षांचे उमेदवार त्यांच्या चिन्हावर लढतील. शिवसेनेचे उमेदवार मुख्यमंत्री शिंदे, तर राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार ठरवतील, असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे परत एनडीएमध्ये येऊ शकतात का, असे विचारले असता ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे. त्यामुळे आमची मने दुखावली गेली आहेत.'
येत्या ५ मार्च रोजी नागपूरमध्ये 'राष्ट्रीय नमो युवा संमेलन' होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे राज्यातील सर्व आमदार यावेळी उपस्थित राहतील. राज्यभरातून १८ ते ३५ वयोगटातील एक लाख तरुण उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात मोदी सरकारने तरुणांसाठी केलेल्या कामांची माहिती दिली जाईल. या संमेलनात आलेल्या तरुणांचे मत, सूचना घेऊन आम्ही भाजपच्या लोकसभेच्या संकल्प पत्रासाठी (जाहीरनामा) त्या सूचना पाठवणार आहोत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
५ मार्चला अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर
येत्या ५ मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघाच्या तयारीचा आढावा घेणार आहे. अकोल्यात होणारी बैठक ही क्लस्टरची बैठक असणार आहे. या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून ७१ प्रतिनिधी सहभागी होतील. त्याच दिवशी दुपारी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र युवा संमेलन आणि सायंकाळी संभाजीनगर येथे जनसंवाद सभा होणार आहे. ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी वंदन महिला संमेलनाला ऑनलाईन संबोधित करतील. त्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ५ हजार महिला सहभागी होतील. महाराष्ट्रातून एकाच वेळेस १५ लाख महिला या ऑनलाइन महिला संमेलनात सहभागी होतील, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.