yuva MAharashtra राज ठाकरे आता कुणाची मुलं अंगा-खांद्यावर खेळवणार?

राज ठाकरे आता कुणाची मुलं अंगा-खांद्यावर खेळवणार?



सांगली समाचार  - दि. २० मार्च २०२४
मुंबई  - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याची चर्चा आहे. कारण मागील चार दिवसांत त्यांची तब्बल दोन वेळा दिल्लीवारी घडली आहे. या संभाव्य युतीवर आता त्याची सर्वाधिक चर्चा नाशिकमध्ये होत आहे. नुकताच मनसेच्या अठराव्या वर्धापनदिनी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे स्मरण आता यानिमित्ताने होत आहे.

मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या प्रदीर्घ भाषणात काही सूचक वक्तव्ये केली होती. त्याची कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चा झाली होती. या वेळी ठाकरे म्हणाले होते, "कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा. मला स्वतःची पोरं अंगा खांद्यावर खेळवायची आहेत. मी दुसऱ्यांची पोरं अंगा खांद्यावर खेळवणार नाही. महाराष्ट्रात आपणच सत्तेवर येऊ."

लोकसभेच्या तोंडावर अजित पवार गटाची नाराजी दूर; शिंदे सरकारनं उचललं मोठं पाऊल
राज ठाकरे यांनी ज्या भारतीय जनता पक्षावर इतर राजकीय पक्ष व नेत्यांची तोडफोड आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा आणल्याचा आरोप दहा विसवांपूर्वी केला होता. आता त्याच महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय राज ठाकरे घेतील का? अशी चर्चा आता होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता आहे. त्याचे दूरगामी राजकीय परिणाम भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर होणार आहे. त्याचे पडसाद आता नाशिक शहरातही उमटताना दिसले.


महायुतीसमवेत मनसे जाणार आहे का? तसे झाल्यास मनसेच्या कार्यकर्त्यांना भाजप आणि महायुतीचा प्रचार करावा लागेल. त्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचादेखील समावेश आहे. यामध्ये लोकसभेत मनसेला किती जागा मिळतील? हा उत्सुकतेचा विषय आहे. त्यातून मनसेला काय लाभ होणार आणि मनसेच्या मदतीने भाजप व महायुतीच्या अन्य पक्षांना किती लाभ होणार हा राजकीय चर्चेचा विषय आहे. त्यातून राज ठाकरे आता नेमकी कोणाची मुलं अंगा-खांद्यावर खेळवतील याविषयी शहरात चर्चा आहे.

राज ठाकरे सोबत डीलसाठी फडणवीस का नाहीत? विनोद तावडेंसोबत अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना
राज ठाकरे यांच्या निर्णयामुळे नाशिकच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अनेक कार्यकर्त्यांना मनसे स्वबळावर फारसा काही प्रभाव दाखवू शकेल अशी स्थिती नव्हती. आता त्यांनी सर्वप्रथम नाशिक लोकसभा मतदारसंघावर आपला हक्क सांगण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ती एक नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मनसेकडून मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन शहरांवर प्रामुख्याने फोकस करण्यात आलेला आहे. त्या दृष्टीने महायुतीत जाण्याचा निर्णय भाजप अजित पवार गट आणि मुख्यमंत्री शिंदे गटाला किती लाभ व किती हानी करणारा ठरेल? हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. त्यातून राज ठाकरे आपल्या स्वतःची किती 'मुले' सत्तेत पोहोचवितात हा महत्त्वाचा विषय असेल.

मनसेने महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्यास आगामी लोकसभा विधानसभा आणि महापालिका अशा तिन्ही निवडणुकांमध्ये हे ऐक्य राहणार का? त्या जागावाटपात मनसेची भागीदारी किती? असे विविध विषय आत्ताच चर्चेत येऊ लागले आहेत. विशेषतः स्थानिक कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला योग्य वाटा मिळेल असे वाटू लागले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या एका निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा आणि संधी अशा संमिश्र भावना आहेत.