yuva MAharashtra दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार... नेमकं प्रकरण काय ?

दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार... नेमकं प्रकरण काय ?



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
मुंबई : दहावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. अशातच विज्ञान एकच्या पेपरमधील एका प्रश्नावरुन विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम दिसून आला आहे. अशातच आमदार कपिल पाटील  यांनी यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि महाराष्ट्र बोर्डाला पत्र लिहिलं आहे. तसेच, या पत्रातून कपिल पाटील यांनी संदिग्ध प्रश्नाच्या उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याची मागणी केली आहे. 

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी इयत्तेच्या विज्ञान एक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एका संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना अतिरिक्त गुण देण्याबाबत आमदार कपिल पाटील यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे. आमदार कपिल पाटील यांची ही मागणी मान्य झाली तर दहावीच्या विद्यार्थ्यांना संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांसाठी अतिरिक्त गुण मिळू शकतील. 

आमदार कपिल पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय? 

दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत विज्ञान एक या विषयाचा पेपर अठरा मार्च रोजी झाला होता. त्यात सर्वात लहान आकाराच्या अणूचं नाव लिहा, असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली आहे. अनेक पालकांनी याबाबत आपल्याकडे चिंता व्यक्त केल्याचं आमदार कपिल पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे. वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता या प्रश्नाचं अचूक उत्तर 'हायड्रोजन' हे आहे. पण काही शाळांमध्ये या प्रश्नाचं उत्तर 'हेलियम', तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर 'हायड्रोजन' असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधलं आहे. 


कपिल पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे की, "हायड्रोजनच्या अणुत्रिजेची गणना मूल्य 53 pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिजेचे गणना मूल्य 31 pm आहे; कारण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. हायड्रोजन हा द्वि-आण्वीय वायू आहे तर हेलिअम हा एक-अण्वीय वायू आहे. त्यामुळे, अणुत्रिज्यांच्या गणना केलेल्या मूल्यांची तुलना करणे योग्य नाही. दोन्ही अणूंची 'बॅन दे वॉल्झ' (Van der Waals) त्रिज्यांची तुलना करणे अधिक योग्य ठरेल. हायड्रोजन अणूची बॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 120 pm आहे तर हेलिअम अणूची वॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 140 pm आहे."

"या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे ? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल. तरी कृपया इयत्ता दहावीच्या विज्ञान 1 विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या उत्तराबाबत खुलासा करावा.", अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.