yuva MAharashtra रविवारी ३१ मार्चला बँका खुल्या राहणार!

रविवारी ३१ मार्चला बँका खुल्या राहणार!



सांगली समाचार - दि. २३ मार्च २०२४
नवी दिल्ली - आर्थिक वर्षांच्या अखेरच्या दिवशी मोठया प्रमाणात होणारे व्यवहार हाताळण्याच्या दृष्टीने येत्या ३१ मार्च रोजी रविवार असूनही बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील, असे रिझव्‍‌र्ह बँकेने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च रोजी सरकारी पावत्या आणि देयके यांच्याशी व्यवहार करणाऱ्या बँकांच्या सर्व शाखा व्यवहारांसाठी खुल्या ठेवण्याची विनंती केली आहे, जेणेकरून विद्यमान आर्थिक वर्षांतील पावत्या आणि देयकांशी संबंधित सर्व सरकारी व्यवहारांचा हिशेब ठेवता येईल. त्यानुसार, बँकांना सर्व शाखा खुल्या ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि बँकांनी देखील त्यांच्या ग्राहकांना या दिवशी बँकिंग सेवांच्या उपलब्धतेबद्दल माहिती द्यावी असे रिझव्‍‌र्ह बँकेने नमूद केले आहे.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह अ‍ॅक्सिस बँक, सिटी युनियन बँक, डीसीबी बँक, फेडरल बँक, एचडीएफसी बँक, आणि आयसीआयसीआय बँक या खासगी क्षेत्रातील बँका देखील ३१ मार्चच्या रविवारी कार्यरत राहतील.


तीन दिवस कामकाज बंद 

महिन्यातील चौथा शनिवार २३ मार्चला असल्याने बँकांचे कामकाज बंद राहील, तर २४ मार्चला रविवार आणि येत्या सोमवारी धूलिवंदन असल्याने बँकांचे कामकाज सलग तीन दिवस बंद राहील.