yuva MAharashtra आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळायला हवा; नाना पटोले

आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळायला हवा; नाना पटोले



सांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४
मुंबई - मोदी सरकारच्या गेल्या दहा वर्षांच्या काळात देश रसातळाला गेला आहे. देशाचे संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. ती टिकविणे हे सर्वांचे काम आहे. आगामी निवडणूक जगण्यामरण्याच्या प्रश्नांसोबतच देश वाचविण्यासाठीची अंतिम लढाई आहे. भाजपचा पराभव हा मुख्य उद्देश आहे. इंडिया आघाडी व राज्यातील महाविकास आघाडी त्यांचा पराभव करेल. राज्यात महाविकास आघाडीत कसलाही बेबनाव नाही मात्र आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळायला हवा.

प्रश्नः महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षांचे आघाडीचे ट्युनिंग होते ते शिवसेना ठाकरे गटामुळे बिघडले का?

उत्तरः महाविकास आघाडीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र सत्तेमध्ये होतो, त्यामुळे तसे आम्हाला कोणी नवीन नाही. देशाचे संविधान वाचविण्याच्या एका समान उद्दिष्टावर आम्ही एकत्र आलेलो आहोत. उद्धव ठाकरे यांनी आमच्या बरोबरीनेच हुकूमशाहीच्या विरोधात भूमिका घेतली आहे त्यामुळे ट्युनिंग बिघडले नाही तर अधिक मजबूत झालेले आहे. जागा वाटपाबाबत शिवसेनेसोबतचा अनुभव चांगला होता. खूप 'शिकवून' गेला. आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे.


काँग्रेस जागा वाटपावरून शिवसेनेवर खूप नाराज आहे. विशेष करून सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघावरून, त्याबाबत आपले मत काय?

उत्तरः माध्यमांना जागा वाटपावरून महाविकास आघाडीमधीलच वाद दिसत आहेत. आमच्यापेक्षा महायुतीमध्ये प्रत्येक जागेवरून वाद आहे. आमच्यामध्ये ४८ पैकी केवळ तीन ते चार जागांवरच जरा जास्त चर्चा झाली आहे, त्यावर आम्ही चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढू. जागा वाटपात सांगली आणि भिवंडी या दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही. त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. शिवसेनेला पश्चिम महाराष्ट्रात एक तरी मतदारसंघ हवा आहे, म्हणून त्यांना सांगलीची जागा हवी आहे.

महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी येण्यात काय अडचणी आहेत?

उत्तरः काँग्रेसकडून तर अजिबातच अडचण नाही. काँग्रेसने 'वंचित'चा प्रस्ताव मान्य केला आहे, आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने देखील त्यावर सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे.

प्रश्नः कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहात?

उत्तरः संविधान आणि लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचविण्यासाठी आहे. भाजपचा पराभव करणे हाच मुख्य उद्देश आहे. महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करेल. मागील १० वर्षांत भाजपने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले. त्यांचा उगम हा नागपूरचा आहे. देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्यात आले. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात असंतोष आहे. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही,

प्रश्नः 'भारत जो़डो न्याय यात्रे'ची समाप्ती मुंबईत झाली. त्यानिमित्ताने शिवाजी पार्कवर मोठी सभा देखील झाली. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला पण निवडणुकीमध्ये त्याचा फायदा तुम्हाला होईल का?

उत्तरः नक्कीच, फायदा होईल. आमचे नेते राहुल गांधी यांच्या पहिल्या भारत जोडो यात्रेचा परिणामही दिसून आला होता. आता भारत जोडो न्याय यात्रेचा परिणाम देखील दिसून येईल. भारत जोडो न्याय यात्रेकडे निवडणुकीच्या दृष्टीने पाहता कामा नये. राहुल गांधींनी एक व्यापक भूमिका घेत देश ज्या हुकूमशाहीच्या दिशेने जात आहे त्याला रोखण्यासाठी, जनमत तयार करण्यासाठी काढलेली ही यात्रा आहे. राहुल गांधी एक शांतता दूत आहे, त्यामुळे या यात्रेकडे निवडणुकीच्या चौकटीत आपण पाहू नये. या यात्रेचा देशभरात सकारात्मक परिणाम झाला आहे.