सांगली समाचार- दि. १३ मार्च २०२४
सांगली - सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला जाणार असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते विशाल पाटील हे भाजपमध्ये जातील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या संभाव्य यादीत विशाल पाटलांचे नाव असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, विशाल पाटलांनी "काँग्रेस हाच विचार आणि काँग्रेस हाच बाणा' असे ट्विट करीत भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळून लावली. विशाल यांनी केलेल्या ट्विटमुळे ते काँग्रेस सोडणार नसून सांगलीची जागाही काँग्रेसला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा (उबाठा) आहे. पण हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसला हवा आहे. या ठिकाणी काँग्रेसकडून शाहू महाराज निवडणूक लढविणार आहेत. शिवसेना सहजासहजी हा मतदारसंघ सोडायला तयार नाही. पण सोडला तर त्यांनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगली द्या, अशी अट घातली आहे. त्यादृष्टीने चर्चेची पावले पडू लागली आहेत. सांगली मतदारसंघ शिवसेनेला गेल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून मतदारसंघात सुरू झाली.
त्यामध्येच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील या मर्द पैलवानाला दिल्लीत पाठवा, असे आवाहन केले. याचा अर्थ शिवसेनेकडून सांगलीतून चंद्रहार पाटील निवडणूक लढवणार, असाच झाला होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरीकडे भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्या विरोधात पक्षांतर्गत तसेच विकासकामांवरून नाराजी आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना तिकीट देऊ नये अशी भाजपच्या बहुतांशी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यातच काँग्रेसच्या हक्काची जागा गेल्यास विशाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून जोरदार निवडणुकीची तयारी केली आहे. मात्र, तिकीट कापल्यास काय होणार अशी चर्चा दूर करत असताना त्यांनी 'काँग्रेस हाच विचार आणि काँग्रेस हाच बाणा..! असे ट्विट करीत स्पष्टीकरण दिले.
'काँग्रेसचे विचार घेऊनच काम करणार'
मी काँग्रेसमधून निवडणूक लढायला तयार आहे, पण मला जर तिकीट मिळाले नाही, वेगळा विचार नसून, प्रसंगी थांबायची तयारी आहे. आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे अन्य पक्षात जाणार नसल्याचे काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. वसंतदादा घराणे काँग्रेस एकनिष्ठ राहिले आहे. त्यामुळे यापुढेही काँग्रेसचे विचार घेऊनच काम करणार असल्याचे स्पष्ट केले.