yuva MAharashtra ठाकरे - पवारांविषयीचा सहानुभूतीचा फुगा महाओपिनियन पोलने फोडला; महाराष्ट्रात महायुतीच "दादा"; महाविकास आघाडीच्या हाती निराशा!!

ठाकरे - पवारांविषयीचा सहानुभूतीचा फुगा महाओपिनियन पोलने फोडला; महाराष्ट्रात महायुतीच "दादा"; महाविकास आघाडीच्या हाती निराशा!!



सांगली समाचार - दि. १६ मार्च २०२४
मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर ठाकरे पवारांच्या बाजूने महाराष्ट्रात सहानुभूती उसळल्याचा फुगा एका महाओपिनियन पोलने फोडला आहे. महाराष्ट्रात महायुतीलाच 48 पैकी 41 जागा मिळण्याची भाकीत महाओपिनियन पोलने वर्तविले. ठाकरे पवार आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला फक्त 7 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातल्या मतांच्या टक्केवारी देखील तब्बल 5 % चा फरक दाखवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात महायुतीला म्हणजेच भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) या सगळ्या पक्षांना मिळून 41 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सात जागा मिळतील असा अंदाज आहे. News 18 च्या मेगा ओपिनियन पोलने हा अंदाज वर्तवला आहे.


काय आहे पोलचा अंदाज?

महाराष्ट्रात महायुतीला 48 % तर 43 % मते महाविकास आघाडीला पडू शकतात. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत. तो 12 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीतला आहे. भारतभरात हा सर्व्हे करण्यात आला. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे याचा फायदा देशात एनडीएला होणार हेच हा ओपिनियन पोल सांगतो आहे.

2019 आणि 2024 ची परिस्थिती पूर्ण वेगळी

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती होती. त्यावेळी शिवसेनेचं विभाजन झालेलं नव्हतं. त्यावेळी 23 जागा शिवसेनेने लढवल्या होत्या, तर 25 जागा भाजपाने लढवल्या होत्या. भाजपाने 25 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या तर शिवसेनेने 23 पैकी 18 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसने 19 जागा लढवल्या होत्या त्यापैकी 4 जिंकल्या होत्या. मात्र 2019 आणि 2024 या दोन लोकसभा निवडणुकांची राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सध्याच्या घडीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना महाराष्ट्रात रंगणार आहे. मात्र महाविकास आघाडीला अवघ्या 7 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त होतो आहे.