Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत आ. विश्वजीत कदम यांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा नाही, जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
सांगली - राज्यात लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत चालले आहे. युती-आघाड्यांमध्येही जागावाटपावरुन गोंधळ उडालेले पाहायला मिळत आहे. अशात आपआपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्तेही सरसावले आहेत. मात्र, असे करताना फेक न्यूजही पसरवल्या जात आहेत.

दरम्यान असाच एक प्रकार 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन समोर आला आहे. एका यूजरने एक व्हिडिओ शेअर करत पलूस-कडेगाव मतदारसंघाचे काँग्रेचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे.


काय आहे दावा?

'एक्स'वर एका यूजरने व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये आमदार विश्वजीत कदम सांगलीचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. 'एक्स'वरील पोस्टचं येथे पाहता येईल.

पुढे या व्हिडिओसह यूजरने लिहिले आहे की, "शिवसेनेला सांगलीची सीट दिल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम नाराज, त्यांचा सांगली भाजपचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील पाटील यांना जाहीर पाठिंबा, यंदा हैट्रिकचं."

यूजरने शेअर केलेल्या व्हिडिओतील काही भाग हा 29 ऑगस्ट 2023 चा आहे. जो सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी त्यांच्या 'एक्स' अकाउंटवर शेअर केला होता. व्हिडिओ पलूस व कडेगांव मतदारसंघातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यातील असल्याचे स्पष्ट होते. मात्र, या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ युट्यूब अथवा सोशल मीडियावर उपलब्ध नाही.

व्हायरल व्हिडिओबाबत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या कार्यालयाकडेही चौकशी केली. आ. कदमांच्या प्रसिद्धी प्रमुखांनी हा दावा खोटा आणि चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. तसेच हा व्हिडिओ गेल्या वर्षी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या भूमिपूजन सोहळ्यातील असल्याचेही त्यांनी सांगितले.

पलूस व कडेगांव मतदारसंघात ऑगस्ट 2023 मध्ये आमदार विश्वजीत कदम, संजयकाका पाटील आणि आमदार अरुण लाड हे एकाच मंचावर होते का? असा कोणता कार्यक्रम झाला होता का? हेदेखील आम्ही तपासले. यानुसार एका वृत्तपत्रात २९ ऑगस्ट २०२३ रोजी बातमी छापून आली होती. यात भूमिपूजन सोहळ्यात खासदार, आमदार एकाच मंचावर होते आणि दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्र येऊ असे या नेत्यांनी म्हटल्याचा उल्लेख आहे. यावरून आमदारांच्या प्रसिद्धी प्रमुखांनी केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचे स्पष्ट झाले.

ऑगस्ट २०२३ मधील एका कार्यक्रमात आमदार कदम यांनी उपस्थित नेत्यांच्या कामाबाबत भाष्य केले होते. शेतीच्या पाण्यासाठी गट-तट विसरून एकत्र येऊ आणि दुष्काळ, पाणीटंचाई या प्रश्नांवर मात करू, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.तसेच व्हायरल व्हिडिओ आणि बातमीतील फोटो यामध्येही साम्य आहे.

आमदार कदम यांच्या प्रसिद्धी प्रमुखांच्या प्रतिक्रियेवरून जुना व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला जात असल्याचे स्पष्ट होते. आ. कदम यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. २०२३ मधील व्हिडिओ लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरचा आहे असा भासवून तो चुकीच्या संदर्भाने व्हायरल केला जात आहे. मतदारांनी अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये.