Sangli Samachar

The Janshakti News

जय भीम जय मिम'नंतर आंबेडकरांचे आता 'मिशन ओबीसी'



सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आता ओबीसी मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी आघाडी करून राज्यात खळबळ उडवली होती. त्यावेळी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील विजयी झाले. त्यावेळी 'जय भीम जय मिम' असा नारा दिला होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेली वंचित-एमआयएम आघाडी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तुटली. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना वंचित बहुजन आघाडीने ओबीसी मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. परभणीमध्ये झालेल्या सभेत आंबेडकर यांनी यासंदर्भात आघाडीचे धोरण स्पष्ट केले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कॉंग्रेस नेतृत्वाशी सूत जुळले नाही. शिवसेना आणि भाजपशी वैचारिक विरोध असल्याने आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि राज्यात वंचित बहुजन आघाडी स्थापन केल्याचे आंबेडकरांनी स्पष्ट केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'वंचित'ने मुस्लिम मतदारांना जवळ केले होते. यासाठी ओवेसी बंधूंच्या एमआयएम या पक्षाला आघाडीत सामील करून घेतले. 'जय भीम जय मिम', असा नवा नाराही दिला. अनेक ठिकाणी मुस्लिम नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा फायदा आघाडीला झाला. दलित- मुस्लिम ही कॉंग्रेसची पारंपरिक मतपेटी. मात्र, आंबेडकरांमुळे मते वंचित-एमआयएमच्या उमेदवारांना मिळाली आणि फटका कॉंग्रेसला बसला.



मोदी लाट आणि पारंपरिक मतपेटीला दूर गेल्यामुळे बहुतांश मतदारसंघातील निकाल बदलले. यामुळे वंचित बहुजन आघाडीवर भाजपची 'बी टीम' म्हणून आरोप झाले. २०२४ च्या निवडणुकीला सामोरे जाताना राजकीय पटलावर मोठे बदल झाले. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली. तसेच देशात भाजपविरोधी राजकीय पक्षांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीत समावेश होण्यासाठी आंबेडकर आग्रही आहेत. महाविकास आघाडीमध्ये त्याचा समावेश झाला असला तरी त्याबाबत स्पष्टता नाही. राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावर ओबीसी समाज एकवटला आहे. ओबीसी आरक्षणात अन्य कोणी वाटेकरी होऊ नये, यासाठी राज्यात जनमत तयार करण्यात येत आहे. राज्यात एल्गार महासभा आयोजित करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर हे ओबीसी महासभेतून ओबीसी आरक्षणाबाबत प्रखर मते व्यक्त करत आहेत.

परभणीतील सभेत ॲड. प्रकाश आंबेडकर हे प्रमुख वक्ते होते. या वेळी त्यांनी महायुती किंवा महाविकास आघाडीची बाजू न घेता जो पक्ष १४ ठिकाणी ओबीसी उमेदवार देईल तो ओबीसींचा पक्ष, असे जाहीर केले. यामधून वंचित बहुजन आघाडी जास्तीत जास्त ओबीसी उमेदवार देईल, तसेच राज्यातील एकवटलेल्या ओबीसी समाजाला आपलेसे करणार हे स्पष्ट आहे. ओबीसी मतदारांनी आंबेडकरांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, तर भाजपची पारंपरिक मतपेटी असलेला ओबीसी मतदार भाजपपासून दूर जाऊ शकतो आणि याचा मोठा फटका येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसू शकतो.