सांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४
मुंबई - दर निवडणुकीत वॉर रूम उभारणाऱ्या भाजपने आता राज्य पातळीवरील कमांड सेंटरही सुरू केले आहे. या दोन्हींचा थेट कनेक्ट दिल्लीतील प्रदेश भाजप मुख्यालयाशी ठेवण्यात आला असून, तेथील यंत्रणा मिनिटामिनिटाला आढावा घेते आणि आवश्यक त्या सूचनादेखील करते. भाजपचे प्रदेश कार्यालय आणि अन्य दोन ठिकाणी हे वॉर रूम आणि कमांड सेंटर सुरू करण्यात आले आहेत. आ. श्रीकांत भारतीय यांच्या नेतृत्वात प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली यंत्रणा राबविली जात आहे. ४५ कर्मचारी तिथे काम करीत आहेत. त्यात कंटेन्ट क्रिएटर, रिसर्चर यांचाही समावेश आहे.
विविध माध्यमांमधून भाजप वा विरोधकांबद्दल आलेल्या बातम्यांचे दररोज विश्लेषण केले जाते. दिल्ली मुख्यालयाला त्याचा फीडबॅक दिला जातो. अपप्रचाराला कसे उत्तर द्यायचे, कोणत्या विषयावर कोणत्या नेत्याने वा प्रवक्त्याने बोलायचे हे ठरविले जाते. सोशल मीडियामध्ये होणाऱ्या बदनामीला लगेच कसे प्रत्युत्तर द्यायचे, चुकीची माहिती दिली जात असेल तर वस्तुस्थिती लगेच सोशल मीडियात कशी समोर आणायची, यासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे.
२६ विभागांसह वकिलांची टीमही तैनात
एकूण २६ विभाग करण्यात आले आहेत. त्यात कार्यालय व्यवस्थापन, माध्यम विभाग, विधि विभाग, साहित्य छपाई, वाहनव्यवस्था, हिशेब, आरोपपत्र, घोषणापत्र, सांस्कृतिक, सामाजिक संपर्क, बुथ रचना, नेत्यांचे दौरे, भाषणांचे मुद्दे, विस्तारक आदी विभागांचा यात समावेश आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग कोणत्याही पातळीवर होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आठ वकिलांची एक टीम तैनात करण्यात आली आहे.