Sangli Samachar

The Janshakti News

भाजप लढणार ४४५ जागांवर, मित्रपक्षांची संख्या ४० वर



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
नवी दिल्ली  - २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४४० ते ४४५ जागा लढविण्याची शक्यता आहे. पक्षाने आतापर्यंत ४०५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले असून, उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा आणि अन्य काही राज्यांतील काही जागांसाठी उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे. महाराष्ट्रातील २५ उमेदवारांची नावे पक्षाने घोषित केली असून, आणखी किमान सहा नावे येत्या काही दिवसांत घोषित केली जाऊ शकतात.भाजपने स्वतःचे ३७० जागांचे आणि रालोआचे ४०० जागांचे विजयी लक्ष्य गाठण्यासाठी जवळपास सर्वच राज्यांत छोट्या पक्षांसोबत युती केली असून, मित्रपक्षांची संख्या ४० वर गेली आहे. याशिवाय ओडिशात बिजदसोबत, हरयाणात जेजेपीसोबत व पंजाबमध्ये अकाली दलासोबत युती करण्यासाठी पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती.

एवढेच नाही तर रालोआला भक्कम करण्यासाठी पक्षाने काही ईशान्य राज्यांतील जागांवरील आपला दावा सोडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या कार्यकाळात अधिकाधिक पक्षांना सोबत घेऊन मोठ्या सुधारणा घडवून आणू इच्छितात. त्यामुळे ते काही जागांवर पाणी सोडत असल्याचे अंतर्गत गोटातील सूत्रांनी सांगितले. याच कारणामुळे भाजप नेतृत्व प्रसंगी पक्ष कार्यकत्यांच्या भावना दुखावून छोट्या- मोठ्या सर्व पक्षांतील नेत्यांचे पक्षात स्वागत करत आहे. पक्षाने मंत्र्यांसह १०० हून अधिक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारुन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

मित्रपक्षांची संख्या वाढली
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या वेळी अधिक पक्षांसोबत युती केली आहे. भाजपच्या मित्रपक्षांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या असेल.
२०१९ मध्ये भाजपला आंध्र प्रदेशात २ भोपळाही फोडता आला नव्हता. या वेळी तेथे पक्षाचे खाते उघडावे म्हणून एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षासोबत युती करण्यात आली आहे. या युतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी जोर लावला होता.
तेलंगणामध्ये अन्य राज्यांप्रमाणेच भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. २०१४ मध्ये भाजपने ४२८ उमेदवार उभे केले आणि २८२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये ४३७ उमेदवार उभे करून ३०३ जागांवर विजय मिळवला होता.