सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
मुंबई - आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवा 'वजनदार' नेता मिळाला आहे. महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब मिळविलेले पैलवान चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवबंधन बांधून घेतल्यानंतर पै चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे व उपस्थितांना शब्द दिला की, मी वचन देतो महाराष्ट्रात सगळ्यात पहिला निकाल सांगलीतून येईल.
ठाकरेंचे निवासस्थान मातोश्रीवर मशाल हाती घेत ते शिवसेना ठाकरे गटात सामील झाले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले.
ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, आज मला मनापासून आभार मानायचे आहेत की, एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारले. तुम्ही मला सांगली लोकसभेच्यादृष्टीने जो मान दिला, त्यासाठी मी आभारी आहे. तुम्ही एका शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी देऊन तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे. साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करुन दाखवण्याची सवय आहे. महाराष्ट्रातील पहिला निकाल सांगलीतून असेल, एवढे वचन मी तुम्हाला देतो, असे चंद्रहार पाटील यांनी म्हटले.