Sangli Samachar

The Janshakti News

महायुतीच्या समझौताची रात्र, अमित शाह यांच्या बंगल्यावर खल, मोठ्या घडामोडी



सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या हालचाली घडत आहेत. कारण महाराष्ट्राचे अतिशय महत्त्वाचे नेते आज दिल्लीत पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले आहेत. दिल्लीत आज रात्री प्रचंड खलबतं होणार आहेत. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच दिल्लीत पक्षाच्या हायकमांडशी चर्चा झाली. या बैठकीत कोणत्या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला कोणत्या आणि किती जागा दिल्या जातील? याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.


अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावेळी काय ठरलेलं ?

विशेष म्हणजे अमित शाह हे याच आठवड्यात महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शाह यांची महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली होती. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. ज्या मतदारसंघात ज्याचा खासदार त्यालाच ती जागा असा फॉर्म्युला ठरणार नसल्याची माहिती या बैठकीनंतर समोर आली होती. प्रत्येक मतदारसंघात ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून येऊ शकतो त्यालाच उमेदवार दिला जाईल, असा फॉर्म्युला या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या फॉर्म्युल्यानुसार भाजप तब्बल 35 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर शिंदे गटाला 8 आणि अजित पवार गटाला केवळ 3 ते 4 जागा मिळतील, अशी चर्चा सुरु आहे. पण शिंदे गट आणि अजित पवार गट जास्त जागांसाठी आग्रही आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय-काय ठरतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.