सांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
गांधीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये नादब्रह्म कला केंद्र बांधण्यासाठी मनमंदिर फाउंडेशनला त्यांच्या नाववर असलेली जमीन दान केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रेरणेने मनमंदिर फाउंडेशन गांधीनगरमध्ये उभारत असलेल्या 'नादब्रह्म' कला केंद्राची पायाभरणी करण्यात आली. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली सरकारी जमीन मनमंदिर फाउंडेशनला दान केली आहे. तिथे आता भव्य 'नाद ब्रह्म' कला केंद्र बांधले जाईल. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले 'नादब्रह्म' कला केंद्र भविष्यात संगीत कला उपक्रमांसाठी एक अनोखे केंद्र असेल. भारतीय संगीत कलांचे ज्ञान एकाच छताखाली आणणे हा त्याचा उद्देश आहे.
'नाद ब्रह्म' कला केंद्र आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल
'नाद ब्रह्म' कला केंद्र अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. यामध्ये 200 लोकांची क्षमता असलेले थिएटर, 2 ब्लॅक बॉक्स थिएटर, संगीत आणि नृत्य शिकण्यासाठी 12 पेक्षा जास्त बहुउद्देशीय वर्ग, अभ्यास आणि सरावासाठी 5 परफॉर्मन्स स्टुडिओ यांचा समावेश असेल. याशिवाय 1 ओपन थिएटर, दिव्यांगांसाठी विशेष उद्यान, मैदानी संगीत उद्यान, आधुनिक ग्रंथालय, संगीताचा इतिहास दाखवणारे संग्रहालय यांचा समावेश आहे.