सांगली समाचार - दि. १० मार्च २०२४
सांगली - आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या रॅंकिंगमध्ये सांगली, मिरज, कुपवाड महापालिका राज्यात पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आली आहे. जानेवारी महिन्यातील रॅंकिंग गुरुवारी (दि. ७) राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केले. पहिल्या क्रमांकावर पुणे महापालिका (३८.२१ गुण) आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर (३७.४३), तिसऱ्या क्रमांकावर सांगली (३६.०९), चौथ्या क्रमांकावर नागपूर ( ३३.५०) आणि पाचव्या क्रमांकावर नवी मुंबई महापालिका (३३.११) आहे. राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आरोग्यविषयक कार्यक्रम राबविण्याच्या गतीवरुन प्रत्येक महिन्याचा गुणानुक्रम काढला जातो.
जानेवारीच्या रॅंकिंगमध्ये कोल्हापूर, सांगली महापालिका अग्रेसर ठरल्या आहेत. शेवटच्या पाच क्रमांकांंमध्ये वसई-विरार (२३.०१), धुळे (२१), छत्रपती संभाजीनगर (२०.८८), परभणी (२०.८८) आणि जळगाव १८.८३) या महापालिकांचा समावेश आहे. त्यांच्या कामात महत्वपूर्ण सुधारणा होणे गरजेचे असल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त धीरजकुमार यांनी म्हटले आहे. सर्व महापालिकांचे कार्यक्रमनिहाय गुण पाहिल्यास माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, क्षयरोग निवारण, आयुष्मान भारत आदी कार्यक्रमांवर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचेही म्हटले आहे.