सांगली समाचार- दि. २६ मार्च २०२४
सांगली - काँग्रेस व ठाकरे शिवसेनेत सांगलीच्या जागेवरून घामासान सुरूच आहे. दोघेही सांगलीवरील हक्क सोडायला तयार नाहीत. परिणामी सांगलीत महाआघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 'दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ' ही म्हण प्रत्यक्षात उतरण्याची चर्चा मतदार संघात रंगली आहे.
राऊत-ठाकरे यांनी कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला सांगली हवी, असा हट्ट धरला आहे. तर अशी कुठलीही चर्चा झाली नाही. विनाकारण तिढा निर्माण करून आघाडी बिघाडी करू नका. अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे मिरजेतील सभेत पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून, स्वतः निर्माण केलेल्या चक्रव्युहात अडकले आहेत. तर जिल्हा व राज्यपातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांनी "सांगली आमचीच" हा ठेका धरला आहे. काँग्रेसच्या हाय कमांडकडे 'आम्ही सांगली वरील हक्क सोडणार नाही' असे ठणकावून सांगितले आहे. त्यावर विशाल पाटील यांच्या नावावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगितले असले तरी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या यादीत विशाल पाटील यांचे नाव अजूनही आढळून येत नाही, त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, डॉ. विश्वजीत कदम, सतेज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे शिष्ट मंडळ आता थेट सोनिया गांधींच्या दरबारात गा-हाणे मांडण्यासाठी जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत विशाल पाटील यांना लोकसभा निवडणुकीत उभे करायचे आणि निवडूनही आणायचेच, असा चंग स्थानिक व राज्य पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांनी बांधला आहे. परंतु काँग्रेस हाय कमांड आपले पत्ते ओपन करायला तयार नाही.
या पार्श्वभूमीवर भाजपाचे संजय काका पाटील हे पुन्हा हॅट्रिक करणार का ? याची उत्सुकता मतदारात दिसून येत आहे. अंतर्गत वाद, मतदारात असलेली नाराजी या साऱ्यातून संजय काका कसा मार्ग काढतात, यावर विजयाचे गणित अवलंबून असलं, तरी 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, या न्यायाने संजय काकांच्या पाठीमागे विजयासाठी 'तुतारी' घेतलेल्या कार्यकर्त्यांची फौज उभी करण्यात आली आहे. याचा यंदाही संजय काकांना फायदाच होणार आहे. आता संजय काकांसमोर विशालदादा की पै. चंद्रहार पाटील ? की दोघेही ? या प्रश्नचिन्हांवर संजय काकांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार का ? याचे उत्तर चांगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतरच मिळणार आहे.
तोपर्यंत "आग व धूर संगतीनच"...