yuva MAharashtra सांगली महापालिका प्रभाग रचनेने 'कही खुशी-कही गम'; सांगलीत आता ८५ नगरसेवक

सांगली महापालिका प्रभाग रचनेने 'कही खुशी-कही गम'; सांगलीत आता ८५ नगरसेवक



सांगली समाचार - दि. ३ मार्च २०२४
सांगली - सरकारने मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत पुन्हा २०१९ च्या महापालिका निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या ७८ वरुन ८५ पर्यंत वाढणार आहे. चार सदस्यांमुळे कामांमध्ये श्रेयवाद निर्माण होऊन विकासावर परिणाम होत असल्याने या निर्णयामुळे 'कही खुशी-कही गम' अशी परिस्थिती आहे.

राज्यात सत्तेवर असलेल्या एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारने पुन्हा प्रभागांच्या संख्येत बदल केला आहे. महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील समस्या, प्रश्नांचे निराकरण हे प्रभागात सामुहिक प्रतिनिधित्वामुळे सुलभ होऊ शकते. त्याचप्रमाणे प्रभागातील विकास कामांना वेग येऊन, नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील. याचा विचार करून चार समस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.



तत्कालिन महाविकास आघाडीचा निर्णय विद्यमान सरकारने रद्द केल्यामुळे महापालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुका या पूर्वीप्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहेत. या निर्णयानंतर विरोधी सदस्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेत सध्या निवडून येणारे सभागृहात ७८ नगरसेवक आहेत. यामध्ये वीस प्रभाग केले आहेत. १८ प्रभाग हे चार सदस्यांचे आहेत. तर दोन प्रभाग तीन सदस्यांचे आहेत. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसंख्येनुसार नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. वाढीव लोकसंख्या गृहीत धरून त्यानुसारच चार सदस्यीय प्रभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या समस्या सोडविण्यात यश येईल असे राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या नेत्यांना वाटत आहे.

सांगली महापालिकेची लोकसंख्या ६ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे नगरसेवकांची संख्या किमान ६५ तर कमाल ८५ ठेवण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेची नगरसेवकांची संख्या आता ८५ होणार आहे. नगरसेवकांची संख्या ८५ निश्चित झाली तर महापालिका क्षेत्रात चार सदस्यांचे १८ प्रभाग होणार आहेत. तर ३ सदस्यांचे तीन प्रभाग होण्याची शक्यता आहे. आगामी होणाऱ्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहेत. याचा काही जणांना फायदा तर काही जणांना तोटा होणार आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे नगरसेवकांमध्ये कामाची मंजुरी, श्रेयवाद यावरून वाद रंगत होते. याचा फटका विकासकामांवर होतो, असे विरोधकांचे मत आहे. दरम्यान महायुतीने घेतलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचनेच्या निर्णयामुळे 'कही खुशी, कही गम' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.