नवी दिल्ली - राहुल गांधी यांच्या 'शक्ती विरुद्ध लढा' टिप्पणीवर आज ( दि. २० मार्च) केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी नवी दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तक्रार दाखल केली. तसेच त्यांच्यावर तत्काळ कारवाईची मागणी केली. 'काँग्रेस पक्षाकडून अनेक विधाने करण्यात आली आहेत. आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला या प्रकरणी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. जर काँग्रेसने असेच खोटे बोलणे सुरूच ठेवले आणि कारवाई केली नाही, तर ते रोखले जाईल,' असे मंत्री हरदीप यांनी सांगितले.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
मुंबईतील जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की,. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) शिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. हिंदू धर्मात 'शक्ती' हा शब्द आहे. आपण एका शक्तीविरोधात लढत आहोत. प्रश्न असा आहे की, ही शक्ती काय आहे? राजाचा आत्मा 'ईव्हीएम'मध्ये आहे. हे सत्य आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. आणि देशातील प्रत्येक संस्थेत ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागात आहे. नुकतीच महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस पक्ष सोडला. त्यापूर्वी ते नेते माझ्या आईसमोर रडत म्हणाले की, 'सोनियाजी, मला लाज वाटते की, या शक्तीशी लढण्याची ताकद माझ्यात नाही. मला तुरुंगात जायचे नाही.' अशा प्रकारे हजारो लोकांना धमकावण्यात आले आहे," असा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला होता.
'शक्ती' विधानावर PM नरेंद्र मोदींनी केला होता हल्लाबोल
राहुल गांधी यांच्या 'शक्ती' टिप्पणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जगतियाल येथील जाहीर सभेत प्रत्युत्तर दिले होते. ते म्हणाले होते की, 'कोणी 'शक्ती'च्या नाशाबद्दल बोलू शकते का?. चंद्रयान ज्या बिंदूवर उतरले त्याला 'शिवशक्ती' असे नाव देऊन आम्ही चांद्रयान मोहिमेचे यश समर्पित केले. 'शक्ती' नष्ट करू इच्छिणाऱ्या आणि 'शक्ती'ची पूजा करणाऱ्यांमध्ये आता खरी लढाई आहे. या सामन्याचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.'