yuva MAharashtra विकासाच्या बळावर संजयकाका पाटील यांना पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार

विकासाच्या बळावर संजयकाका पाटील यांना पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार



सांगली समाचार  - दि. २० मार्च २०२४
तासगाव - खासदार संजयकाका पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा सावर्डे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गेल्या ३२ वर्षातील कार्यकर्त्यांच्या संघर्षमय आठवणींनी संजयकाका भावनिक झाले. तर कार्यकर्त्यांनी जिल्हाभर पक्षाची भूमिका आणि संजयकाका पाटील यांनी केलेली विकासकामे पोहचवून पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी केला. 

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिलाच मेळावा

भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे, भाजप निवडणूक जिल्हा प्रभारी दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर युवा नेते प्रभाकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे, माजी सरचिटणीस नितीन पाटील यांची भाषणे झाली.  

जिल्हा सरचिटणीस सुनिल पाटील, दिलीप पवार, तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, अविनाश पाटील, शशिकांत जमदाडे, पैलवान संभाजीतात्या सावर्डेकर, भाजप तासगाव तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह तासगाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजयकाका पाटील म्हणाले, यापुर्वीच्या काळात मिळेल ते अन्न खाऊन आपण प्रचार केलात…लोकांसाठी आपण सर्वांनी संघर्ष केला. पण कधी तक्रार केली नाही. याची मला जाणीव आहे. संघर्षमय आठवणींनी संजयकाका भावनिक झाले. समोर उपस्थित जनसमुदाय गलबलून गेला. 

संजयकाका पुढे म्हणाले, एवढं जीवापाड प्रेम करणारी माणसं पाठीशी उभा राहून या जिल्ह्यात इतिहास घडवतात. हा इतिहास घडविणाऱ्या मंडळींचा मला सार्थ अभिमान आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय ताकदीने आणि ठरवलेल्या नियोजनानुसार काम करायचे आहे. आपल्याला मोठे यश मिळणार आहे. राज्यात आणि देशात सर्वाधिक मतांनी विजयी व्हायचं आहे. भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्या पाठीशी आहे. देशाचे नेते नरेंद्र मोदी एक ही दिवस विश्रांती न घेता देशसेवा करत आहेत. आपल्याला त्यांच्या बरोबर सेवा करण्याची संधी मिळाली. देशातील आणि राज्यातील नेत्यांनी विश्वास दाखवून तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. वेगवेगळ्या बातम्या येत होत्या पण उमेदवारी मिळाली. भारतीय जनता पार्टी काम पाहून संधी देणारा पक्ष आहे. तासगाव तालुक्याचं मताधिक्य लाखापेक्षा जास्त असलं पाहिजे. पुढील पाच वर्षांत राहिलेली सर्व कामे पूर्ण केली जातील.