Sangli Samachar

The Janshakti News

असं ठिकाण जिथे मरणावर आहे बंदी



सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
नवी दिल्ली - जगात अनेक देश आहेत आणि प्रत्येक देशाचे आपले वेगळे नियम, कायदे आहेत. मात्र, काही देशांमधील नियम असे आहेत, जे आश्चर्यचकित करणारे आहेत. असाच एका शहरात एक अजब नियम आहे, ज्याबद्दल ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या नियमानुसार, इथे सरकारने लोकांच्या मृत्यूवर बॅन लावला आहे. एखादा व्यक्ती मरणाच्या दारात पोहोचला असेल तर त्याला इथून दूर पाठवलं जातं. जर कोणाचा अचानक आजारपणाने मृत्यू झाला तर त्याला शहरापासून 2000 किमी दूर नेऊन दफन केलं जातं. हे वाचून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे ठिकाण नेमकं कुठे आहे आणि इथे असा नियम का आहे?

नॉर्वेचे लॉन्गइयरब्येन शहर आर्क्टिक सर्कलमध्ये वसलेलं आहे. हे ठिकाण खूप थंड राहतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की इथे किमान तापमान -46 अंशांवर जातं आणि कमाल तापमान 3-7 अंशांपर्यंत असतं. अशा स्थितीत येथील तापमान किती भयंकर आहे हे समजू शकतं. याच तापमानामुळे हा विचित्र नियम करण्यात आला आहे.


टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नॉर्वेजियन सरकारने 1950 मध्ये हा विचित्र कायदा बनवला होता. ज्याच्या अंतर्गत या भागात कोणीही मरू शकत नाही आणि मृतांना दफनही करता येणार नाही. हे करण्यासाठी, 2000 किमी अंतरावर जावं लागेल. आता प्रश्न पडतो की असा नियम का करण्यात आला? खरं तर, प्रचंड थंडीमुळे हा भाग नेहमी बर्फाच्या दाट चादरीने झाकलेला असतो. त्यामुळे याठिकाणी मृतदेह दफन केल्यावर मृतदेह कुजत नाही आणि त्वचाही वर्षानुवर्षे मूळ स्वरूपात राहते. त्या भागात शतकानुशतके जुने विषाणू आणि जीवाणू सुरक्षित राहात असल्याचं अहवालात आढळून आलं. अशा परिस्थितीत या विषाणूंमुळे तेथील लोकांसाठी धोका वाढू शकतो. हेच कारण आहे, की सरकारने हा नियम बनवला होता आणि लोकांना आपल्या जवळच्या लोकांचे मृतदेह दूरवर दफन करण्यास सांगितलं होतं.