सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
पंढरपूर - विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या कामास सुरू करण्यात आली आहे. हे काम करत असताना विठ्ठलाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिसरात करण्यात येणारी ७३ कोटी ८५ लाख ९५ हजार २२४ रुपयांची विकासकामे निश्चित करण्यात आली आहेत.
मंदिर व परिसरात करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मुख्य विठ्ठल मंदिरातील गर्भगृह चार खांबी अर्धमंडप यासाठी ५ कोटी ३ लाख ५८ हजार ३४ रुपये, रुक्मिणी मंदिरासाठी २ कोटी ७० लाख ५३ हजार ३१ रुपये, नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नूतनीकरण ५ कोटी ५ लाख ५१ हजार ९७४ रुपये, महाद्वार व दोन्ही बाजूच्या पडसाळीसह विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाइट फरशी, चांदी काढण्यात येणार आहे. ग्रेनाइट काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नये, मूर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे. काळा पाशाण स्वच्छ करण्यासाठी स्टैंड बाल्टिंग करण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीने सांगितले आहे.