सांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४
मुंबई - निवडणुकीची घोषणा होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र राज्यात काँग्रेस व्यतिरिक्त अद्याप महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाने जागावाटपाची यादी जाहीर केलेली नाही. यातच जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडी दूर होतेय की काय, असा प्रश्न निर्माण झालेला असताना मविआने वंचितला जागावाटपाचा नवीन प्रस्ताव दिला आहे.
मविआने वंचिताला चार जागांचा प्रस्ताव दिला होता. ज्यावरून वंचितने नाराजी व्यक्त केली होती. तसेच वंचितने मविआपासून दूर जाण्याचे संकेतही दिले होते. यातच आता मविआने वंचितला जागावाटपाचा नवीन प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकस आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आता चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव दिला आहे. वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीने आता वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
मविआच्या प्रस्तावावर वंचितची काय आहे प्रतिक्रिया?
याचबाबत माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, ''वंचित बहुजन आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात जो निर्णय आहे, तो आज संध्यकाळी वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. याबाबत आज सविस्तर चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल. तसेच हा निर्णय उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला जाईल.''
राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर, अजित पवारांची घोषणा; बारामतीचा सस्पेन्स कायम
महाविकास आघाडीकडून वंचितला काही निरोप आला आहे का? याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, ''आता त्यासंदर्भात जी काही माहिती असेल ती वंचितचे अध्यक्ष प्रकार आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील.''