सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
नवी दिल्ली - विज्ञानाच्या जगात पुन्हा एकदा एक चमत्कार घडला आहे. प्रयोगशाळेत लहान आकाराची फुप्फुसे आणि इतर अवयव वाढवण्यात ब्रिटिश शास्त्रज्ञांना यश आले आहे. शास्त्रज्ञांनी या अवयवांना 'मिनी-ऑर्गन्स' असे नाव दिले आहे. या शोधामुळे भविष्यात गर्भाच्या आजारांवर उपचार करण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. गर्भाशयात भ्रूण टिकवून ठेवणाऱ्या द्रवातून पेशी काढून हे अवयव विकसित करण्यात आले आहेत. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज (लंडन) आणि ग्रेट ऑर्मड स्ट्रीट हॉस्पिटलचे हे संशोधन नेचर मेडिसीनमध्ये प्रकाशित झाले आहे.
नेमका फायदा काय होणार ?
- हे छोटे अवयव नवीन औषधे विकसित करण्यासाठी आणि अवयवांचे कार्य समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या शोधामुळे मूल जन्माला येण्यापूर्वीच जन्मजात आजारांवर उपचार करता येऊ शकतात.
- याशिवाय गर्भातील बाळाला आवश्यक पोषणही पुरवले जाऊ शकते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
- संशोधकांनी १२ गर्भवती महिलांच्या गर्भाशयातून पेशी गोळा केल्या. हे नमुने नियमित चाचणीदरम्यान घेण्यात आले. या पेशींपासून लहान अवयव विकसित केले गेले.
शास्त्रज्ञांनी काय केले ?
युनिव्हर्सिटी कॉलेजच्या संशोधक मॅटिया गेर्ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गर्भाशयातून काढलेल्या स्टेम पेशी या गर्भाच्या पेशी होत्या. गर्भधारणेदरम्यान, असे असणे सामान्य आहे. शास्त्रज्ञांनी पेशी वेगळ्या केल्या आणि त्या कोणत्या अवयवाच्या आहेत, त्या ओळखल्या. यातील काही पेशी फुप्फुसाच्या, काही मूत्रपिंडाच्या तर काही आतड्यांच्या होत्या. याच आधारावर लहान अवयव विकसित केले गेले.