yuva MAharashtra विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित ! पै. चंद्रहार पाटील बॅकफूटवर !

विशाल पाटील यांची उमेदवारी निश्चित ! पै. चंद्रहार पाटील बॅकफूटवर !



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात अखेर काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब झाले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांनी व नेत्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कथन करून विशाल पाटील हेच कसे योग्य उमेदवार आहेत हे पटवून दिल्याने यावर सर्वांचे एकमत झाले.

मुंबई येथील राहुल यांच्या न्याय यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेले काँग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष खर्गे यांची भेट घेऊन राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष पटोले व सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी ठामपणे विशाल पाटील यांच्या उमेदवारी बाबत हट्ट धरला होता. या सर्वांचा परिणाम नवी दिल्ली येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीवर होऊन विशाल पाटील यांची उमेदवारी नक्की झाली.


दरम्यान ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आलेले पै. चंद्रहार पाटील यांनी एक पाऊल मागे घेतले असून, महाविकास आघाडी तर्फे जर विशालदादांची उमेदवारी नक्की झाली, तर आपण त्यांच्या प्रचारात सहभागी होऊन असे म्हटले आहे. त्यामुळे आज मिरज येथे होणाऱ्या शिवसेनेच्या जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.