सांगली समाचार - दि. १२ मार्च २०२४
मुंबई - काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या दि. १२ मार्च रोजी दुपारी २ वाजता नंदूरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ६७ दिवसांत ६७०० किमीचा प्रवास करत आहे. 'भारत जोडो न्याय यात्रा, न्याय का हक मिलने तक' या घोषवाक्यासह ही यात्रा मार्गक्रमण करत आहे. मागील वर्षी राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर ४००० किमी ची पदयात्रा काढली होती. या यात्रेला जनतेचे प्रचंड समर्थन लाभले होते तसाच भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षाकडून भारत जोडो न्याय यात्रेत अडथळे आणण्याचा जाणीवपूर्क प्रयत्न केला पण यात्रा न डगमगता सुरुच राहिली. भारत जोडो न्याय यात्रेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जय्यत तयारी केली असून मुंबईत राहुल गांधी व न्याय यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेला व शिवाजी पार्क वरील जाहीर सभेला प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसकडून करण्यात येत आहे.