सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
सांगली - काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना गटात सांगलीवरून जोरदार धुमचक्री सुरू असतानाच, वसंतदादांच्या समाधीवर दर्शन घेतले आणि त्यांच्याच नातवाविरोधात काँग्रेसच्या नाकावर टिच्चून उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील जाहीर सभेत "अब की बार चंद्रहार" अशा घोषणा देत पै. चंद्रहार पाटील यांची एकतर्फी उमेदवारी जाहीरही केली.
वास्तविक या जागेवरून महाआघाडीत वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरू होती. येथील तिढा सोडवण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हट्टाने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. आता "टोकाची भूमिका घेणार, वेळप्रसंगी विरोधी लढणार" अशी भीमगर्जना करणारे विशाल दादा आणि काँग्रेस... विशेषतः डॉ. विश्वजीत कदम व आ. विक्रमसिंह सावंत यांनी ही जागा प्रतिष्ठेची केलेली आहे. अगदी दिल्लीपर्यंतही या मंडळींनी आपली कैफियत मांडली व कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस सांगली वरील हक्क सोडणार नाही, असे ठणकावून सांगितले होते. ही मंडळी आता काय भूमिका घेतात याचे जनतेला औत्सुक्य आहे.
मध्यम मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या मध्यस्थीने नाना पटोले व संजय राऊत यांची बैठक घेण्यात आली होती. परंतु या दोघांच्यात शरद पवार यांच्या साक्षीनेच जोरदार खडाजंगी झाली. "आम्ही कोल्हापूर हसत हसत सोडले आहे, आता सांगली सोडणार नाही." असे राऊत यांनीही बजावले होते. त्याप्रमाणे मिरजेत येऊन, ठाकरे व राऊत यांनी पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. आता लक्ष लागले आहे ते काँग्रेसच्या नेते मंडळींकडे...