हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नाशी तडजोड आणि शाहू महाराज छत्रपती यांचा आदर करून आपल्या काळजावर दगड ठेवत कोल्हापुरातील शिवसेनेची जागा काँग्रेसला सोडल्याचे बोलले जाते. त्याबदल्यात काँग्रेसने सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला दिल्याचे सांगितले जाते. मात्र, सांगलीतून काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील यांनी दिल्लीवारी करत सांगली लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. शिवाय शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मिरज येथे झालेल्या सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने या मतदारसंघावरील अजूनही दावा सोडलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी 'मातोश्री'कडे न्याय मागितला आहे.
दरम्यान, भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांच्याकडून माढ्यात तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील हे आग्रही आहेत. धैर्यशील यांनी तर माढा लोकसभा मतदारसंघातून प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे. पण, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका अजूनही भाजपकडे झुकणारी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे मोहिते पाटलांमध्ये माढ्याच्या उमेदवारीवरून काही प्रमाणात मतभेद असल्याची कुजबूज सुरू आहे.