सांगली समाचार - दि. १६ मार्च २०२४
मुंबई - मित्रानो, तुम्ही चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहणबद्दल नक्कीच ऐकलं असेल किंवा ग्रहण बघितलं सुद्धा असेल. चंद्र जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो तेव्हा आपल्याला संपूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळते. या काळात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो, त्यामुळे सूर्याची किरणे काही काळ पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. यंदा ८ एप्रिलला आपल्याला संपूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. परंतु हे काय साधंसुधं सूर्यग्रहण नसेल. कारण ५० वर्षातील हे सर्वात लांब सूर्यग्रहण असणार आहे. आणि महत्वाचे म्हणजे यावेळी तब्बल 7.5 मिनिटे पृथ्वीवर अंधार असेल.
तुम्हाला प्रश्न पडला असेल कि तब्बल 7.5 मिनिटे पृथ्वीवर काळोख कसा काय पडणार? तर 8 एप्रिलला जेव्हा ग्रहण होईल तेव्हा चंद्र पृथ्वीपासून केवळ 3,60,000 किलोमीटर अंतरावर असेल. पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे चंद्राचा हा नेहमीपेक्षा थोडा मोठा दिसेल. चंद्राचा आकार हा मोठा झाल्यामुळे आपोआपच तो सूर्याला जास्त काळ झाकून ठेवेल आणि पृथ्वीवर जास्त वेळ अंधार पाहायला मिळेल. ग्रहणाच्या दिवशी पृथ्वी आणि चंद्र सूर्यापासून त्यांचे सरासरी अंतर 15 दशलक्ष किलोमीटर राखेल. या योगायोगांमुळे, सूर्य 7.5 मिनिटे दिसणार नाही. यापूर्वी 1973 साली सूर्यग्रहणावेळी जास्त वेळ अंधार पडला होता, आता त्यानंतर जवळपास ५० वर्षानंतर हा दुर्मिळ योग पाहायला मिळणार आहे.
यंदाचे संपूर्ण सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2:14 पासून सुरू होईल आणि 2:22 पर्यंत सुरू राहील. हे सूर्यग्रहण मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेच्या काही भागात दिसणार आहे. ही दुर्मिळ घटना भारतात दिसणार नाही कारण त्यावेळी भारतात रात्रीची वेळ असणार आहे, त्यामुळे भारतीय खगोलप्रेमींची मात्र निराशा होणार आहे.