सांगली समाचार - दि. २५ मार्च २०२४
कराड - 'कृष्णा'काठावरील निसर्गसंपन्न वातावरणात शेतीपूरक उत्पादने देशभर प्रसिद्ध आहेत. आता या यादीत कराड तालुक्यातील दुशेरे गावच्या शेतकऱ्यांनी पिकवलेला इंद्रायणी तांदूळ सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. इंद्रायणी भाताचा हा 'ब्रँड' सध्या महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणी निर्यात केला जात असून, दिवसेंदिवस या भाताचा सुगंध राज्यभर दरवळू लागला आहे.
कराड तालुक्यातील व्यवसाय शेतीवर अवलंबून आहेत. नदीकाठासह बागायत क्षेत्र जास्त असल्याने या परिसरातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करतात. विशेषतः ऊसपट्टा जास्त असल्याने शेतकरी उसाला जोड म्हणून अन्य पिकेही घेतात. या प्रयोगाच्या यादीत आता दुशेरे गावच्या इंद्रायणी भाताची वर्णी लागली आहे. तालुक्यात कृष्णाकाठावर दुशेरे येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस पिकाबरोबर जया, दोडकी या वाणाचे भात पीक घेतले होते. या भाताला कऱ्हाडसह परिसरातील बाजारपेठेत मागणी असायची आता दुशेरेतील शेतकऱ्यांनी नव्या इंद्रायणी भात पिकाची ओळख तयार केली आहे.
दुशेरेत गत २५ वर्षांपासून इंद्रायणी भात पिकाला सुरुवात झाली खरी; पण सुरुवातीला शेतकरी काहीसे साशंक होते; मात्र जसजसा इंद्रायणी भाताचा सुगंध वाढायला लागला, तशी मागणीही वाढली. मागणी वाढल्याने साहजिकच शेतकऱ्यांनी इंद्रायणी पिकाला पसंती देत त्यावर जोर दिला सुरुवातीला कऱ्हाडच्या बाजारपेठेत मागणी असलेला इंद्रायणी भात आता संपूर्ण राज्यात पसंतीला उतरला आहे. साधारण दीडशे दिवसाचे भात पीक असते. आरोग्यासाठी हा भात उत्तम असल्याची खात्री पटल्याने ग्राहकांकडून थेट मागणीही वाढली आहे. हा भात उत्तम आहे; तसेच लहान मुलांसाठी पेज बनवताना या भाताची चव अत्यंत वेगळीच आहे. त्यामुळे लहान मुलांतही पौष्टिक असा भात आवडीचा बनला आहे.
या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे हा भात सात्त्विक आणि पौष्टिक आहे; तसेच औषधी गुणधर्मही आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड आदींसह अन्य जिह्यांमध्ये दुशेरेच्या तांदळाची मागणी आहे. दुशेरेच्या या इंद्रायणी तांदळाला शासनाची वेगवेगळी पारितोषिके मिळाली आहेत. रेठरे बासुमती हा तांदूळ विभागात प्रसिद्ध आहे. रेठरे बुद्रूक येथील शेतकऱ्यांकडून त्यांचे उत्पादन घेतले जाते. आता दुशेरेतील इंद्रायणी तांदळाचीही ओळख निर्माण झाली आहे. हा तांदूळ दुशेरेकरांचा 'ब्रँड' बनत आहे.