सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
सांगली - हल्ली मुले मोबाईलमध्ये खूप गुंतली आहेत. या मोबाईल ऐवजी मुलांनी मैदान जवळ केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक चांगले होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. निमित्त होते विश्रामबाग येथील महासंस्कृती महोत्सवातर्गंत, ' यलो सांगली हॅपी स्ट्रीट ' या कार्यक्रमाचे . . .
जीवनातील टेन्शन, चिंता, काळजी या सारख्या शब्दाला पूर्ण विराम देण्याच्या उद्देशाने या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला पालकमंत्र्यांनी अचानक भेट दिली. तेथील संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर पालकमंत्रीही क्षणभरासाठी आपल्या बालपणीच्या कालखंडात रंगून गेले. उपस्थित स्थानिक कलावंताशी त्यांनी अतिशय आत्मियतेने संवाद साधला. तसेच ' नंदीबैल - मालकास 'छोटीशी बक्षिसीही अदा केली.
सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या हॅपी स्ट्रीट उपक्रमामध्ये बालकांबरोबर - पालक ही आपले वय विसरून सहभागी झाले होते. या हॅपी स्ट्रीट उपक्रमात बालपणीच्या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. बाळ गोपाळांना आनंद देणारा मिकी माऊस, काचेच्या गोट्या, लघोर, घोडेस्वारी, योगासने, लेझीम, झांज, युद्ध कलेची प्रात्यक्षिके, झुंबा डान्स, गायन, मिमिक्री त्याचबरोबर उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोणताही कलाप्रकार सादर करावा याची मुभा सादरकर्त्यांना यावेळी देण्यात आली होती. त्यालाही नागरिकांनी गायन व नृत्याच्या रूपाने प्रतिसाद दिला.
याप्रसंगी बैलगाडी, घोडेस्वारीची सफर मुलांनी अनुभवली तर नंदी बैलाची मोठी शिंगे बघून बाल चमू अचंबित झाला. स्वतःचे वय विसरायला लावणाऱ्या या जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाबाबत उपस्थितांच्या चेहऱ्यावर 'आनंदरेषा' न उमटल्या तर नवलच... शेवटी उपस्थितांचे आभार निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मानले.
आज दि. ४ मार्च (सोमवार) रोजी महासंस्कृती महोत्सवात सादर होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे - (१) सायंकाळी ५.३० ते ७ लोककला / शाहीर (सांगली परिसरातील लोककलाकारांचे सादरीकरण),
(२) सायंकाळी ७ ते ९.३० आपली संस्कृती (परंपरा जपणाऱ्या लोककलांचा अविष्कार).