yuva MAharashtra काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर; विशाल दादांचे नाव नसल्याने कार्यकर्त्यांची घालमेल !

काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर; विशाल दादांचे नाव नसल्याने कार्यकर्त्यांची घालमेल !



सांगली समाचार - दि. २४ मार्च २०२४
मुंबई - काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. या यादीत 46 उमेदवारांची नावे आहेत. वाराणसीतून काँग्रेसने पुन्हा उत्तर प्रदेशचे उमेदवार अजय राय यांना पीएम मोदींविरोधात उभे केले आहे. याशिवाय राजगडमधून दिग्विजय सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. तर या यादीत महाराष्ट्रातील चार जागांचा समावेश करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अजय राय यांना वाराणसीतून उमेदवारी दिली आहे. याचा अर्थ या जागेवर त्यांचा सामना सध्याचे खासदार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणार आहे. काँग्रेसने शनिवारी लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली, ज्यामध्ये राजस्थानमधील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जयपूर ग्रामीणमधून अनिल चोप्रा, करौली-धोलपूरमधून भजनलाल जाटव आणि नागौरची जागा आरएलपीसोबत युतीसाठी सोडण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.


महाराष्ट्रातून या चार नावांचा समावेश

रामटेक (राखीव एससी) : रश्मी श्यामकुमार बर्वे
नागपूर : विकास ठाकरे
भंडारा गोंदिया : डॉ. प्रशांत यादवराव पडोळे
गडचिरोली चिमूर : नामदेव किरसान

विशाल दादांचे नाव नसल्याने कार्यकर्त्यांची घालमेल

चौथ्या यादीतही प्रतिष्ठेचे बनलेले उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, त्या विशाल दादांचे नाव चौथ्या यादीतही नसल्याने विशाल दादांच्या कार्यकर्त्यांची घालमेल सुरू झाली आहे. "अजून किती वाट पाहायची ?" सवाल कार्यकर्त्यांच्याकडून विचारला जात आहे. परंतु सर्वांनी सध्या "वेट अँड वॉच" ची भूमिका स्वीकारलेली आहे.

शिवसेनेने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे ही  जागा प्रतिष्ठेची बनलेली आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्यात येत असून जर त्यांनी या  जागेवरील हक्क सोडला तर एकाच एक लढत होऊन काँग्रेसचा पर्यायाने महाआघाडीचा उमेदवार विजय होऊ शकतो. परंतु जर शिवसेनेचे हीच भूमिका राहिली तर येथे काँग्रेस बंडखोरी करून निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे. कदाचित याचा फटका काँग्रेसला पर्यायाने महाआघाडीला बसू शकतो, ही भूमिका उद्धव ठाकरे यांना पटवून देण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. आता शेवटचा प्रयत्न म्हणून काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी या उद्धव ठाकरे यांच्याशी स्वतः चर्चा करणार आहेत. तरीही उद्धव ठाकरेंनी ऐकले नाही तर मात्र काँग्रेस वेगळी भूमिका घेणार आहे.

तिसऱ्या यादीत 7 नावे

यापूर्वी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होती. या यादीत पक्षाने लोकसभेच्या एकूण 57 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत ही यादी तयार करण्यात आली होती. काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत अरुणाचल प्रदेशात 2 जागा, गुजरातमध्ये 11 जागा, कर्नाटकात 17 जागा, महाराष्ट्रात 7 जागा, राजस्थानमध्ये 6, तेलंगणात 5 जागा, पश्चिम बंगालमधील 8 आणि पुद्दुचेरीतील एका जागेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील या 7 उमेदवारांना संधी

अमरावती - आ.बळवंत वानखेडे

सोलापूर - आ. प्रणिती शिंदे

कोल्हापूर - शाहू छत्रपती

पुणे - आ.रवींद्र धंगेकर

नंदुरबार - गोवाशा पाडवी (मुलगा)

नांदेड - वसंतराव चव्हाण

लातूर - डॉ शिवाजीराव कलगे