Sangli Samachar

The Janshakti News

शरद पवार अन् ठाकरेंनी कॉंग्रेसची केली मोठी कोंडी ; 'या' मतदारसंघातील वाद दिल्लीत जाणार ?



सांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाची तारीख जवळ येत आहे. मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा कार्यक्रम ठरलेला नाहीय. भाजप आणि कॉंग्रेसने काही जागांसाठी आपले उमेदवार घोषित केले आहे. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटाने आपले उमेदवार घोषीत केलेले नाहीत. यातच आता भिवंडी आणि सांगली जागेवरून मोठा पेच निर्माण झाला आहे.

भिवंडी लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांनी दावा केला आहे. तर सांगलीत शिवसेनेने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून दोन्ही ठिकाणी काँग्रेसची कोंडी केली आहे. त्यामुळे दोन्ही जागांवरील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आपापला दावा सोडायला तयार नसल्याने राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून दोघांनाही काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी बोलण्याचे सुचवले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी सोमवारी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यात भिवंडी, सांगली यासह ज्या जागांवर तिढा निर्माण झाला आहे ताे साेडविण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.


काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी मात्र हा वाद दिल्लीतील नेतृत्वापर्यंत जाण्याची शक्यता वर्तविली आहे. कोल्हापुर लोकसभेतून कॉंग्रेसने शाहू महाराज यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदम चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे.