सांगली समाचार - दि. १४ मार्च २०२४
सांगली - महाविकास आधाडीमध्ये जागा कोणत्या पक्षाला द्यायची यावर चर्चा सुरू असताना सांगली लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना जाहीर होताच तासगाव, सांगली, मिरजेत कार्यकर्त्यांनी बुधवारी सायंकाळी जल्लोष केला. उमेदवारी जाहीर होताच आपण यावेळी मोठ्या फरकाने विजय संपादन करू असा विश्वास खा. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
भाजपची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये सांगलीसाठी खा. पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली असून पक्षांतर्गत विरोधकावर त्यांनी मात करत उमेदवारीची लढाई जिंकली आहे. महाविकास आघाडीतून विरोधक कोण असणार हे अद्याप अस्पष्ट असताना भाजपने उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे.
केंद्रिय नेतृत्वाने आणि राज्यातील नेतृत्वाने माझ्यावर तिसर्यांदा विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर करून मला पुन्हा लोकसेवेची संधी दिली आहे. माझे सहकारी, मतदार यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे हे फलित असल्याची प्रतिक्रिया खा. पाटील यांनी दिली. विरेाधकांकडून होत असलेल्या आरोपाला आपण योग्य वेळी उत्तर देउ असे सांगितले. भाजपमधील सर्वच नेत्यांना आपण सोबत घेउन काम करणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, खा. पाटील यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याची माहिती समाज माध्यमावर प्रसारित होताच, सांगली बाजार समितीमध्ये प्रचार कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी अभिनंदनासाठी मोठी गर्दी केली होती. तासगावमध्येही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत फटाक्याची आताषबाजी करत पेढे वाटप करत जल्लोष केला.