सांगली समाचार - दि. १ मार्च २०२४
मुंबई - वंचित बहुजन आघाडी हा प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष महाविकास आघाडीत असून मविआतील प्रमुख पक्ष आणि वंचितमध्ये अद्याप जागावाटपाचे गणित अंतिम झालेले नाही. मविआमध्ये चार पक्षांचे जागावाटप अद्याप झालेले नसताना प्रकाश आंबेडकर यांनी या पक्षांना घरचा आहेर दिला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 'फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी. आपली ताकद पाहूनच आघाडीत जागा मागाव्यात. उद्या असं होऊ नये की, कोंबडी आम्ही शिजवली. त्यानंतर आम्हाला फक्त कोंबडीचं मुंडकं दिलं आणि उरलेली कोंबडी इतर लोक घेऊन गेले. आम्ही तसं होऊ देणार नाही. आमच्या लोकांना सांगितलं आहे, आपण शेवटच्या क्षणापर्यंत थांबू. मिळून मिसळून आणि सन्मानाने कोंबडी खाऊ.'
२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. या आघाडीला एक महिना उलटला तरी अद्याप चार पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याच्या चर्चा आहेत. प्रकाश आंबेडकर अजूनही स्वबळावर लढण्याची भाषा बोलत असताना मविआ नेत्यांनी लोकसभेच्या जागांबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. शिवाय महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमही (कॉमन मिनिमम प्रोग्राम) ठरलेला नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने राज्यातल्या ४८ पैकी २७ जागांवर आमची ताकद असल्याचं पत्र मविआ नेत्यांना दिलं होतं. महाविकास आघाडीत ठाकरे गट सर्वाधिक जागा मिळाव्या यासाठी प्रयत्नशील असून शरद पवार गट आणि काँग्रेसलाही अधिकाधिक जागा हव्या आहेत. यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.