सांगली समाचार - दि. ९ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं समजतं. परंतु जागावाटपाच्या फॉर्म्युलावरून महायुतीतले मित्र पक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस समाधानी नसल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 32 हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे. तर शिवसेना 22 जागांसाठी तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 12 जागांसाठी आग्रही होती अशी माहिती आहे. परंतु महायुतीतल्या या दोन्ही मित्र पक्षांना आता एक अंकी जागांवर समाधान मानावं लागेल अशीच अधिक शक्यता आहे.
भाजप 32 हून अधिक जागा, शिवसेनेला जवळपास 10 जागा तर राष्ट्रवादी काँग्रसच्या वाट्याला 3 ते 4 जागा मिळतील असं जागावाटपाचं सूत्र ठरल्याचं समजतं. परंतु यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत नाराजी असल्याचंही समोर येत आहे. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या अपेक्षा उघडपणे बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाची कोंडी होत आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
33+10+5 महायुतीचा फॉर्म्युला ?
2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले. शिवसेनेचे 18 तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 खासदार निवडून आले. यानंतर गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बरीच राजकीय समीकरणं बदलली. शिवसेना आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता 18 पैकी 13 खासदार आहेत. तर अजित पवार यांच्यासोबत चारपैकी एक खासदार आहे. असं असलं तरी दोन्ही पक्षांना किमान आपल्या पक्षाच्या सर्वच विद्यमान खासदारांच्या जागा हव्या होत्या. किमान तेवढ्या जागा तर भाजपने त्यांच्यासाठी कायम ठेवाव्यात अशी अपेक्षा त्यांना होती परंतु तसं होताना दिसत नाहीय असं म्हणावं लागेल. गृहमंत्री अमित शहा दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. मंगळवारी रात्री (5 मार्च) आणि बुधवारी (6 मार्च) अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली. यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते यांनी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी महायुतीचं जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या जवळपास पाच जागा भाजपकडे जातील अशीही माहिती आहे. यात हिंगोली, कोल्हापूर, पालघर, उत्तर पश्चिम, यवतमाळ या जागांचा समावेश असल्याचे समजते. असं असलं तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन ज्येष्ठ नेत्यांनी जागा वाटपाबाबत उघड भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी आपली खंत माध्यमांसमोर बोलून दाखवली.
ते म्हणाले, "आम्ही "महाराष्ट्रात आम्ही मोदी आणि शाहांच्या कामावर विश्वास ठेवून सोबत आलो आहोत. पण आमचा विश्वासघात होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. सध्याच्या आमच्या ज्या जागा आहेत, तिथंही भाजपचे उमेदवार जाऊन प्रचार करत आहेत. मतदारसंघावर दावे करत आहेत. प्रत्यक्षात विद्यमान खासदार असलेल्या ठिकाणीही बळजबरी केली जात आहे," असा आरोप रामदास कदमांनी केला.
रत्नागिरी, मावळ, रायगड, संभाजीनगर याठिकाणी भाजप घृणास्पद राजकारण करत आहे. त्यामुळं मोदी आणि शहांनी महाराष्ट्रातील नेत्यांचे कान उपटायला हवे, असंही कदम म्हणाले. "प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक सोबत आले त्यांचा केसानं गळा कापून तसं करायला नको. याद्वारे वेगळा संदेश जात असल्याचं भान भाजपच्या काही लोकांना असायला हवं," अशी टीका रामदास कदमांनी केली.
"दापोलीत युती असताना भाजपनं माझ्या मुलाच्या विरोधात उघडपणे मतदान केलं. 2009 मध्ये युती असतानाच मला गुहागरमध्ये भाजपनंच पाडलं होतं," असा आरोपही त्यांनी केला. आताही माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये भाजपचे मंत्री चव्हाण आणि भाजप कार्यकर्ते बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटनं करत आहेत. त्यात स्थानिक आमदाराला बाजूला सारलं जात आहे, असं कदम म्हणाले. असं असेल तर भविष्यात भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल भाजपच्या वरिष्ठांनी घ्यायला हवी. पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझं नावही रामदास कदम आहे. तिकिट जाहीर होईल तेव्हा पुन्हा या विषयावर बोलेल, असं त्यांनी सांगितलं.
महायुतीमध्ये वादाची ठिणगी ?
गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत युतीतील जागा वाटपाचे निकष स्पष्ट करण्यात आल्याचं समजतं. निवडून येण्याची क्षमता आणि भाजपचे अंतर्गत सर्वेक्षण यावरच जागा वाटप आणि उमेदवार निश्चित होणार असल्याची चर्चा झाल्याची माहिती आहे. तसंच राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती, दोन पक्षातील फुटींनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती, मराठा आरक्षणाच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनांनंतर मराठा, ओबीसी, धनगर, अशी जातीय समीकरणं असे अनेक मुद्दे जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी लक्षात घेतलं जात असल्याचीही माहिती आहे. परंतु यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अपेक्षित निर्णय न झाल्यास विद्यमान खासदार, इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधून रोष समोर येऊ शकतो.
"2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने 23 जागा लढवल्या होत्या. 2019 मध्ये त्यांनी 25 जागा लढवल्या होत्या आणि 2024 साठी भाजप जवळपास 30 ते 32 जागा लढवत असल्याचं समजतं. याचा अर्थ त्यांची जागा लढवण्याची आकडेवारी आणि पक्षाची ताकद वाढते आहे. शिवसेनेनेची आकडेवारी पाहिली तर 2014 मध्ये 20, 2019 मध्ये 23 आणि आता 2024 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 10-12 जागांवर समाधान मानावं लागेल अशी माहिती आहे.
पण विद्यामान खासदार पाहता शिवसेनेला किमान 20 जागा तरी मिळायला हव्या होत्या. शिवसेना जर एक अंकी जागा लढवत असेल तर मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी भविष्यात पक्षासाठी परिस्थिती अधिकाधिक कठीण होत जाईल. मग बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार वाढवणार कसे? असाही प्रश्न आहे. तसंच जागा वाटपात वाटाघाटी करत असताना पक्षाच्या जागा कमी होणार असतील तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावरही पक्षात प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यामुळे पक्षाचा केडर कमकुवत होऊ शकतो. शिवसेनेचं कॅडर विस्कळीत झालं युतीसाठी ते कसे काम करतील? असाही प्रश्न आहे."
"हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागू होते. अजित पवार यांना केवळ तीन ते पाच जागा मिळणार असतील आगामी विधानसभा निवडणुकीवरही याचा परिणाम दिसेल अशी शक्यता आहे. यातही दोन्ही मित्र पक्षांच्या जागा कमी आल्या तर विधानसभेतही जागा वाटप करताना भाजप याची दखल घेईल आणि या दोन्ही पक्षांच्या जागा कमी होऊ शकतात. ही भीती सुद्धा आहे," दुसऱ्या बाजूला भाजपसाठी केंद्रात आपली सत्ता कायम राहील याकडे प्राधान्य आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत येताना भाजपने काय कमिटमेंट केली होती काय शब्द दिला होता हे सुद्धा महत्त्वाचं आहे असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.
ते म्हणाले, " जी आश्वासनं मिळाली ती पूर्ण होतील. आत्ता जे उघड बोललं जात आहे ते अपेक्षित नव्हतं हे दाखवण्याचा नेत्यांकडून प्रयत्न होईल पण अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं की केवळ निवडून येण्याची क्षमता आहे त्यानुसारच निर्णय होतील. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवाराला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवता येऊ शकते. ही उघड नाराजी व्यक्त करण्याचं कारण म्हणजे उद्या विरोधकांनी टीका केल्यानंतर किमान त्यांच्यासमोर हा मुद्दा स्पष्ट करता येईल. सत्तेत समान वाटा दिला म्हणजे जागांचं वाटप समान होईल अशी अपेक्षा मित्र पक्षाच्या नेतृत्त्वालाही नाही.
जशा शिंदे गटाच्या जाागा आहेत तशा भाजपच्याही जागा आहे. विधानसभेत मात्र वेगळं चित्र दिसू शकतं. भाजपसाठी प्राधान्य आहे ते लोकसभा भाजपने कमिटमेंट नाही असं कोणीच म्हणत नाहीय. " परंतु महायुतीत भाजपचच मोठा भावाच्या भूमिकेत असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मिळेल त्या जागांमध्ये समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे.
'शिंदे गटाला जेवढ्या जागा तेवढ्याच आम्हाला हव्या आहेत'
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात चार खासदार आहेत. अमोल कोल्हे, शिरूर, सुप्रिया सुळे, बारामती, श्रीनिवास पाटील, सातारा आणि सुनील तटकरे, रायगड. यापैकी सुनील तटकरे अजित पवार यांच्यासोबत आहेत. पण तरीही या चार जागा तसंच मावळ, शिरुर असे आणखी काही मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी अजित पवार गट आग्रही होतं असं समजतं. तसंच बारामती, रायगड, शिरुर या तीन जागांसाठीही राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे असं समजतं. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हव्यात अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना मित्र पक्षांना एक आकडी जागा ही पतंगबाजी असल्याचं म्हणत सहका-यांना योग्य सन्मानाप्रमाणे जागा मिळतील असं स्पष्ट केलं. रामदास कदमांच्या टीकेवर पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर, "मी एवढे वर्ष रामदास कदमांना ओळखतो. त्यांना अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची किंवा टोकाचं बोलण्याची सवय आहे. कधी कधी रागानं ते बोलतात," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढं देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री करताना भाजपनं मोठं मन केल्याचा उल्लेख केला. "भाजपनं कायम शिवसेनेचा सन्मान केला आहे. आम्ही 115 आहोत तरीही आमच्याबरोबर आलेल्या शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं," असं फडणवीस म्हणाले. खरी शिवसेना आमच्याबरोबर आली त्याचं आम्हाला समाधान आहे. तसंच आम्ही भक्कमपणे शिंदेंच्या पाठिशी आहोत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही त्यांनी म्हटलं.
"अनेक वेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आपलं महत्त्वं पटवून देण्यासाठी अशाप्रकारचं टोकाचं बोलत असतात. पण आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर लोकांनी अशा प्रकारची वक्तव्यं गांभीर्यानं घेऊ नये," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांवर प्रतिक्रिया दिली. कोणीही काहीही मागणी केली तरी जागावाटपाचा निर्णय वास्तविकतेवरच होईल. तसंच महायुतीत काहीही मतभेद नसल्याचंही फडणवीस म्हणाले. जागावाटपावरून आमच्यात काहीही गंभीर मतभेद नाहीत. दोन-तीन जागांवरून चर्चा सुरू आहे. पण त्यातही गंभीर काही नाही. त्यामुळं लवकरच जागावाटप पूर्ण करू, असं फडणवीसांनी सांगितलं. आमच्याबरोबरची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर मित्रपक्षांना सोबत घेऊनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत.