Sangli Samachar

The Janshakti News

देशासमोरचे ज्वलंत मुद्दे गायब; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल



सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
शिवपुरी - '' देशात जाणीवपूर्वक जातिनिहाय जनगणना टाळली जात असून देशातील मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आदिवासींची संख्या स्पष्ट होण्यासाठी या जनगणनेचा आपण आग्रह करत आहोत, पण केंद्र सरकारकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. देशासमोर बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हे तीन मुद्दे ज्वलंत बनलेले असताना ते गायब केले आहेत,'' अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मध्य प्रदेशातील आज तिसरा दिवस. शिवपुरी येथे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारत जोडो न्याय यात्रेने दोन मार्च रोजी मध्य प्रदेशात प्रवेश केला आणि आज शिवपुरी येथून यात्रेची सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी आदी नेते उपस्थित होते. या यात्रेत माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील सामील झाले.


माधव चौकातील सभेत बोलताना ते म्हणाले, जातीनिहाय जनगणनेबाबत आपण आग्रही असून त्यामुळे देशातील मागासवर्गीयांची आकडेवारी स्पष्ट होईल. आता अदानी शस्त्रनिर्मिती उद्योगातही आले आहेत. अदानी यांची रायफल बाजारात येणार आहे. त्यांची कंपनी गोळ्यांपासून बुलेटप्रूफ जॅकेट तयार करणार आहेत.

'मनरेगा'चे बजेट वार्षिक ६५ हजार कोटी आहे. अशावेळी मोदी सरकारने गरिबांकडे लक्ष दिले नाही. श्रीमंताचे आणि उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ केले. या पैशातून मनरेगासारखी योजना राबविली असती तर ती २४ वर्ष सुरू राहिली असती. बेरोजगारीच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, आजकाल तरुण मोबाईलकडे अधिक लक्ष देत असल्याने मोबाईलधारकांचा पैसा अदानी आणि अंबानी यांच्या खिशात जात आहे, असे ते म्हणाले.

हेलिकॉप्टरची परवानगी नाकारली

राहुल गांधी यांची न्याययात्रा आज सकाळी ज्योतिरादित्य शिंदे यांचा गड असलेल्या शिवपुरी येथून गुना येथे पोचली. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी शिवपुरी येथे रोड शो केला. सकाळच्या वेळी राहुल यांना हेलिकॉप्टरने ग्वाल्हेरहून शिवपुरी येथे यायचे होते. मात्र प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ते मोटारीतून शिवपुरी येथे पोचले. त्यामुळे न्याय यात्रा दोन तास उशिरा निघाली.