Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत बेकायदा वडाप रिक्षा थांब्या विरोधात आंदोलन उभारणार - रामभाऊ पाटील


सांगली समाचार - दि. ४ मार्च २०२४
सांगली - सांगली, मिरज, कुपवाड या मार्गावर बेकायदा वडाप रिक्षा व्यवसाय व अनधिकृत वडापरीक्षा थांबे यांच्या विरोधात वाहतूक शाखेकडून कोणतीही कारवाई होत नाही, उलट त्यांना पाठीशी घातले जाते, असा आरोप करुन आजपासून आम्ही सांगली शहरातील प्रमुख चौकात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलिसांना गुलाब पुष्प देऊन कारवाई करण्याबाबत विनंती करणार आहोत. यावेळी संघटनेकडून फेसबुक लाईव्ह केले जाणार आहे. जोपर्यंत सांगली मिरज मार्गावर बेकायदा रिक्षा वाहतूक आणि अनधिकृत रिक्षा थांबे यांच्या विरोधात कारवाई होत नाही तोपर्यंत, कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना गुलाब पुष्प देऊन, याबाबत कारवाई करण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी रिक्षा युनियनचे अध्यक्ष रामभाऊ पाटील यांनी दिली. या आंदोलनाला सांगली मिरज शहरातील अनेक सामाजिक संघटना व रिक्षा संघटनांनी पाठिंबा व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.


याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, सांगली शहरात सुरू असलेल्या बेकायदा रिक्षा वाहतूक, अनधिकृत रिक्षा थांबे यांच्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी आम्ही गेले वर्षभर करीत आहोत. याबाबत वाहतूक शाखा सांगली यांना अनेकदा निवेदनेही देण्यात आलेली आहेत. परंतु वाहतूक शाखेकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. उलट अशा बेकायदा वडाप रिक्षा वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना वाहतूक शाखेकडून पाठीशी घालण्यात येत आहे. तसेच बेकायदा रिक्षा थांब्याबाबतही कोणतीही कारवाई करण्यात येत नाही. राजवाडा सांगली, मार्केट यार्ड सांगली, जिल्हा न्यायालय समोर विजयनगर, तसेच इतर अनेक ठिकाणी हे असे अनधिकृत थांबे आहेत. त्यांना पोलिसांकडूनच संरक्षण देण्यात येत असल्याचा आरोप रामभाऊ पाटील यांनी केला आहे.
नियमाप्रमाणे व्यवसाय करणाऱ्या वडाप रिक्षा चालकाना आमचा कुठलाही विरोध असणार नाही. सकाळी ९ ते १ व दुपारी ४ ते रात्री ८ यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन विनंती करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल घेतली नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्या बाबत
राष्ट्रवादी रिक्षा युनियनच्या २५ व्या वार्षिक बैठकीत एकमताने ठराव करण्यात आल्याची माहितीही रामभाऊ पाटील यांनी दिली.