yuva MAharashtra गुन्हे असलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले;

गुन्हे असलेल्या उमेदवारांचे धाबे दणाणले;



सांगली समाचार  - दि. १७ मार्च २०२४
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळच्या निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांपासून राजकीय पक्ष आणि मतदारांनाही आयोगाने काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबद्दल आयागाने कठोर पाऊल उचललं आहे. आता उमेदवाराला आपल्यावरील गुन्ह्याची माहिती वर्तमानात प्रसिद्ध करावी लागणार आहे. तर राजकीय पक्षांनाही अशा उमेदवारांना तिकीट का दिलं? हे जाहीर करावं लागणार आहे.

जगातील सर्वात मोठी निवडणूक.

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, 97 कोटी  मतदार आहेत. तर 10.5 लाख मतदान केंद्र असणार आहेत. ही निवडणूक म्हणजे आमच्यासाठी ऐतिहासिक संधी आहे. देशातील निवडणूक म्हणजे एक सण असतो, जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे. 17 व्या लोकसभेची मुदत संपत आहे. प्रत्येक मतदान म्हणजे आमची चाचणी असते. आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी राजकीय पक्ष यांच्याशी संवाद साधला आहे. ही निवडणूक निःपक्षपणे होईल. देशातील 800 निवडणूक अधिकाऱ्यांसोबत मी व्यतिगत चर्चा केली आहे.


मागील 2 वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू आहे. 4 राज्यांमधील विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. दीड कोटींपेक्षा अधिक पोलिंग अधिकारी आहेत. 1.82 कोटी नवीन मतदार मतदान करण्यासाठी येतील. प्रत्येक बुथवर पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाची व्यवस्था करण्यात येईल. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. 85 वर्षांवरील मतदारांना घरून मतदान करता येणार आहे. मतदान हे गरजेचं आहे, यासाठी आम्ही हेलिकॉप्टर, रेल्वेनं, गाडीने वेळ आली तर हत्तीवरून सुद्धा जाणार आहे. पण मतदान हे गरजेचं आहे ते झालंच पाहिजे. 85 वर्षापेक्षा जास्त मतदारांचे मत घरी जावून घेतले जाईल.

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना

कोणत्याही उमेदवाराची माहिती देणे बंधनकारक असणार आहे. त्याच्यावर किती गुन्हे आहे, त्याची संपत्ती किती आहे, याची माहिती मतदारांना केवायसी नावाच्या अॅपलिकेशनमध्ये पाहण्यास मिळणार आहे. ज्या उमेदवारावर गुन्हे दाखल आहे, त्याला 3 वेळा वृत्तपत्र आणि टीव्हीमध्ये जाहिरात द्यावी लागणार आहे. तसंच राजकीय पक्षांना सुद्धा गुन्हेगार असलेल्या उमेदवाराला तिकीट का दिलं याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.

तक्रार कुठे दाखल करायची ?

जर निवडणुकीच्या काळात कुठे पैसे वाटप असेल किंवा कुठेही काही अनुचित प्रकार घडत असेल तर संबंधित व्यक्तीने फक्त एक फोटो काढायचा आहे आणि तो ॲपवर अपलोड करायचा आहे 100 मिनिटांमध्ये आमची टीम फोटोचं लोकेशन पाहून तिथे पोहोचेल. 

हिंसाचार झाला तर लगेच कारवाई होईल

आम्ही नवीन प्रयोग करतोय. काही राज्यांमध्ये पैशाचा आणि बळाचा वापर झाला आहे. निवडणुकीत कोणताही रक्तपात होऊ नये, कुठेही हिंसाचार होता कामा नये. हिंसाचार झाल्यावर कडक कारवाई केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यात एक टीम तयार करण्यात आली आहे. तिथे सोशल मीडियाची टीम असणार आहे. प्रत्येक कंट्रोल रुमवर एक वरिष्ठ अधिकारी असणार आहे. जिथून कुठून तक्रार येईल, तिथे अधिकारी पोहोचतील. प्रत्येक जिल्ह्यात 3 वर्षांपासून अधिकारी काम करत असतील त्यांची बदली करा. दारू, साड्या, पैसे, वापट करण्यास मनाई असणार आहे.