सांगली समाचार - दि. २२ मार्च २०२४
समुद्र हा शब्दच उच्चारालही सारं काही भव्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. समुद्राच्या तळात आजवर अनेक रहस्य गडप झाली आहेत. असेच ब्रिटनमध्ये ३८३ वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या 'मर्चंट रॉयल' या जहाजाच्या अवशेषाचा शोध पुढील महिन्यापासून घेण्यात येणार आहे, असे वृत्त इंग्लंडमधील 'मेट्रो' दैनिकाने दिले आहे. या जहाजाच्या अवशेषाच्या शोधामागील कारणही खास आहे. या जहाजावर सुमारे 4 अब्ज पौंड किमतीचे सोने आणि चांदी होते, असे मानले जाते. जाणून घेवूया ३८३ वर्षांपूर्वी काय घडलं होतं याविषयी…
३८३ वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?
मर्चंट रॉयल या जहाजावर दुर्घटना होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदी होती. त्यामुळे या जहाजाला 'एल डोराडो ऑफ द सीज' हे टोपणनाव दिले गेले आहे. 23 सप्टेंबर 1641 रोजी हे जहाज डार्टमाउथला जात असताना बुडाले. या दुर्घटनेत जहाजावरील १८ क्रू मेंबर मृत्युमुखी पडले होते. 'मेट्रो'ने दिलेल्या वृत्तानुसार, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या ब्रिटनमधील कंपनीला विश्वास आहे की, ते आता बहुचर्चित जहाजाच्या अवशेषांचा शोधू घेवू शकतात. मल्टिबीम सर्व्हिसेस ही कंपनी पुढील महिन्यापासून ब्रिटनच्या किनार्याजवळ जहाजाच्या अवशेषांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी मानवरहित जहाजे आणि प्रगत सोलार तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
खजिना सापडला तर काय करणार?
जहाजाच्या अवशेषांचा शोध घेणार्या मल्टीबीम सर्व्हिसेस कंपनीचे नायजेल हॉज यांनी म्हटलं आहे की, आम्ही जहाजाच्या अवशेषाचा शोध सोन्या-चांदीसाठी नव्हे तर त्याच्या ऐतिहासिक महत्त्वासाठी घेत आहोत. सापडलेला कोणताही खजिना 'वारसा कलाकृती' म्हणून गणला जाईल. जहाजाच्या अवशेषाचा शोध घेणे कठीण मोहिम आहे. पाण्याचा विस्तार अत्यंत धोकादायक आहे. तेथे हजारो बुडालेली जहाजांचे अवशेष आहेत. मर्चंट रॉयल जहाज हे त्यापैकी क आहे. अशा परिस्थितीत बराच भंगार उचलून नंतर तो ओळखावा लागेल. हे बोलण्या एवढे सोपे निश्चितच नाही. मात्र आम्ही या जहाजाचे अवशेष शोधून काढूच, असा विश्वासही ते व्यक्त करतात.
100,000 पौंड सोने, 400 मेक्सिकन चांदीचे बार
मर्चंट रॉयल जहाज बुडण्यापूर्वी कॅडिझच्या स्पॅनिश बंदरात दुरुस्तीसाठी गेले होते. तसेच मेक्सिको आणि कॅरिबियनमधून तिच्या परतीच्या प्रवासात अतिरिक्त माल भरण्यासाठी थांबल्याच्या नोंदी आहेत. अतिरिक्त मालवाहू वस्तू आणि लांब मार्गामुळे जहाजाच्या खांबातून गळती लागल्याने खवळलेला समुद्र आणि सदोष पंप यामुळे जहाज बुडाले असावे. जहाज बुडण्याच्या वेळी त्यावर 100,000 पौंड सोने, 400 मेक्सिकन चांदीचे बार आणि अंदाजे 500,000 स्पॅनिश डॉलर्स होते, असा दावा केला जात आहे. ल्यवान जहाजाचा शोध घेण्याचे अनेक प्रयत्न वर्षानुवर्षे केले गेले; पण यश आलेले नाही.