yuva MAharashtra निवडणूक काळात बँकांना दररोज सादर करावे लागणार 'एसटीआर'

निवडणूक काळात बँकांना दररोज सादर करावे लागणार 'एसटीआर'



सांगली समाचार- दि. १७ मार्च २०२४
नवी दिल्ली  - मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ( दि.१६ मार्च ) निवडणूक तारखांची घोषणा केली. लोकसभा निवडणूक २०२४ साठी ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणूक काळात बँकांना दररोज ‘एसटीआर’ (संशयास्पद व्यवहार अहवाल) दाखल करण्‍याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. जाणून घेवूया याविषयी सविस्‍तर…

पैशाची मागणी अचानक वाढली आहे का?, याबाबत बँका माहिती घेतील

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्‍हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पैशाच्‍या गैरवापर प्रभावीपणे रोखण्‍यासाठी आणि निष्पक्ष निवडणुका घेण्‍यासाठी आम्‍ही काही पावले उचलेली आहे. यामध्‍ये बँकांची भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे. बँकेच्‍या एखाद्‍या शाखेत पैशाची मागणी अचानक वाढली आहे का, याबाबतही बँका माहिती घेतील. तसेच वॉलेटद्वारे पेमेंटमध्ये अधिक मागणी असल्यास ( एसटीआर ) त्‍यावर लक्ष ठेवेल. आम्ही वॉलेटचे सर्व व्यवहार पाहणार आहोत. बँका जवळजवळ दररोज संशयास्पद व्यवहारांचे अहवाल ( एसटीआर ) पाठवतील, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.


निवडणुकीदरम्यान पैशाच्या गैरवापराला बसणार चाप

आम्ही सर्व अंमलबजावणी संस्थांच्या मदतीने निवडणुकीदरम्यान पैशाच्या गैरवापरावर प्रतिबंध केला जाईल, निवडणूक काळातील आर्थिक व्‍यवहारांवर एनपीसीआय, जीएसटी, बँका यासारख्या सशक्त एजन्सी आणि संस्था संशयास्पद व्यवहारांचा मागोवा घेतील.निवडणूक काळातील पैसे आणि दारु वाटप, मोफत वस्तू वितरण रोखण्यासाठी कठोर उपाययोजनाचे आंदश देण्‍यात आले आहते. संवेदनशील वस्तू आणि मोफत वस्तूंच्या बेकायदेशीर वितरणातवर प्रशासनाची करडी नजर असणार आहे. बेकायदेशीर ऑनलाइन रोख हस्तांतरणावर कडक नजर ठेवली जाईल. या माध्‍यमातून निवडणूक काळात पैशाच्‍या गैरवापरला चाप बसेल, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

नवीन महिला मतदारांची संख्या नवीन पुरुष मतदारांच्या तुलनेत 15% अधिक

दरम्यान देशात पुरुष मतदारांची संख्या 49.7 कोटी आहे, तर 2019 मध्ये ही संख्या 46.5 कोटी होती. दुसरीकडे, महिला मतदारांची संख्या ४७.१ कोटी आहे, ही आकडेवारी मागील लोकसभा निवडणुकीत ४३.१ कोटी इतकी होती. मतदार यादीतील लिंग गुणोत्तरामध्ये सकारात्मक वाढ झाल्याचा अहवाल निवडणूक आयोगाने दिला आहे. देशाच्या लोकशाही संरचनेत महिलांची वाढती भूमिका देखील यातून सूचित होते. मतदार यादीत 2.63 कोटीहून अधिक नवीन मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी १.४१ कोटी महिला मतदार आहेत तर १.२२ कोटी पुरुष मतदार आहेत. अशा प्रकारे नवीन महिला मतदारांची संख्या नवीन पुरुष मतदारांच्या तुलनेत 15% अधिक आहे.