सांगली समाचार - दि. ११ मार्च २०२४
सांगली - वंशाचा दिवा वंशाचा दिवा म्हणून अनेकजण तिला, अर्थात मुलींना गर्भातच नष्ट करण्याच्या घटना आपल्याला नव्या नाहीत. अशावेळी मुलीच आपल्या जन्मदात्यांचा आधार बनल्याच्या अनेक घटनाही आपल्या आजूबाजूला पहावयास मिळतात आणि मुलींबद्दलचा आदर अधिकच दृढ होतो. अशीच घटना सांगली येथे नुकतीच अनुभवयास मिळाली.
अन् लेक बापाला घेऊन गेली.
मिरजेतील एका वृद्धाची ही करुण कहाणी. आजारपणामुळे ते मिरजेतील शासकीय रुग्णालयात बरेच दिवस उपचार घेत होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची जबाबदार घेण्यास कोणीच पुढे येईना. सहा-सात महिन्यांपूर्वी बेवारस म्हणून सांगलीत महापालिका व इन्साफ फाउंडेशनच्या सावली बेघर निवारा केंद्रात दाखल झाले. केंद्राच्या व्यवस्थापनाने त्यांची काळजी घेतली. अन्नपाणी व औषधोपचार दिले. यादरम्यान, त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु होता. ८ मार्चरोजी समाजमाध्यमांतून त्यांच्या मुलीचा संपर्क झाला. ती विधवा होती. बाप बेवारस म्हणून सावली केंद्रात राहत असल्याची माहिती मिळताच, ती धावत आली. वडिलांना जवळ केले. भाऊ वडिलांना सांभाळत नसल्याचे सांगितले. मुलाच्या निष्ठुरपणाची कहाणी ऐकून व्यवस्थापक मुस्तफा मुजावर सुन्न झाले. महिला दिनी मुलीने एका मुलीचे कर्तव्य निभावण्याचा मोठेपणा दाखविला. महिला दिनाचा खराच अर्थ सांगितला. महापालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, ज्योती सरवदे यांच्या पुढाकाराने बापाला मुलीच्या रुपाने हक्काचा आश्रय मिळाला. सावली केंद्राचे रफीक मुजावर, रेखा मद्रासी आदी यावेळी उपस्थित होते.