सांगली समाचार - दि. २० मार्च २०२४
मुंबई - महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदार संघावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद टोकाला गेला आहे. 'महाराष्ट्र केसरी'चा दोनदा मान मिळालेले चंद्रहार पाटील यांना शिवसेनेने अचानक पक्षात प्रवेश देत उमेदवारीची अप्रत्यक्ष घोषणा केली. त्याला उघड आव्हान देत काँग्रेसने 'आम्ही सांगली लढणारच' असे जाहीर केले आहे. प्रसंगी टोकाची भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पहिल्या यादीत सांगलीची उमेदवारी खासदार संजय पाटील यांनी जाहीर करून भाजपने आघाडी घेतली आहे. अर्थात, या उमेदवारीवरून पक्षात नाराजीचा सूर उमटत आहे.
सांगलीची जागा काँग्रेसने १९५२ पासून एकूण १७ वेळा जिंकली. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्या, तेव्हाही काँग्रेसने सांगली राखली होती. २०१४ मधील मोदी लाटेत मात्र हा गड ढासळला. २०१९ मध्ये महाआघाडीने ही जागा स्वाभिमानीच्या गळ्यात घातली. काँग्रेसने तो निर्णय मान्य करत आत्मघात करून घेतला. त्यानंतर येथे पुन्हा ताकद वाढवणे, गट बांधणे, लढण्याची ऊर्जा निर्माण करणे याकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले. त्याच मुद्यावर आता काँग्रेसची कोंडी केली गेली आहे.
कोल्हापूर मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपतींनी 'लोकसभा लढेन, मात्र काँग्रेसच्या चिन्हावर', अशी अट घातल्यानंतर सांगलीबाबत वाद सुरू झाला. तोवर सांगली काँग्रेसचीच, असे गृहित धरले गेले होते. शाहूंसाठी शिवसेना (ठाकरे गट) हक्काची कोल्हापूर सोडतेय, त्या बदल्यात सांगली हवी, अशी मागणी केली गेली. शिवसेनेची फारशी ताकद नसलेला 'सांगली' पर्याय म्हणून का निवडला गेला, हे कोडे आहे. ना पक्षाची बांधणी, ना हक्काचा उमेदवार, ना बूथ रचना... तरीही, राजकीय पटलावर धडपडणाऱ्या पैलवान चंद्रहार पाटलांना तातडीने शिवबंधन बांधले गेले.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत सूतोवाच केले. महाविकास आघाडीत सर्वसहमती नसताना शिवसेना पुढच्या चाली खेळत राहिली. त्यामागे कुणाची राजकीय चाल होती का, हा विषय काँग्रेस नेत्यांनी अप्रत्यक्षपणे चर्चेत आणला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'तो मी नव्हे' असा खुलासा करावा लागला.
स्नेहबंधांची आठवण
शिवसेना सांगलीवर दावा करत असताना आमदार विश्वजित कदम आणि जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर दबाव वाढत गेला. शिवसेनेचा चक्रव्यूह भेदण्यासाठी त्यांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला. प्रदेश आणि राष्ट्रीय नेत्यांना विश्वासात घेत त्यांनी शिवसेनेला उघड आव्हान दिले.
सांगलीसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घेण्याची तयारी दर्शवली. विशाल पाटील 'हाता'च्या चिन्हावरच लढतील, असे सांगत आता शिवसेनेची कोंडी करण्यात काँग्रेस यशस्वी झालेली दिसते आहे. आता मुद्दा असा आहे की, वसंतदादांच्या नातवाविरुद्ध उद्धव ठाकरे उमेदवार देणार का? 'बाळासाहेब अन् वसंतदादांचे स्नेहबंध आठवा' असे पत्र काँग्रेसने ठाकरेंना पाठवत त्यांची कोंडी केली आहे.
धडधड वाढली
भाजपचा पराभव हेच अंतिम उद्दिष्ट, अशी गर्जना करणाऱ्या शिवसेनेने ताकद नसलेल्या सांगलीत जोर लावला खरा, मात्र तो चक्रव्यूह बनला आहे. त्यात कुणाचा पाय फसणार, हे पाहावे लागेल. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, काँग्रेस-शिवसेनेच्या वादात चंद्रहार पाटलांचा बळी जाण्याची भीती वाटते'. सध्या चंद्रहार पाटील आणि शिवसेनेची धडधड वाढली आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदांचा 'व्हेंटिलेटर' त्यांना तारतोय.